दुधाला कमी भाव देणारे संघ बरखास्त करणार!

0
मुंबई-  राज्यात शेतकऱ्यांना राज्य सरकारने ठरवलेला दुधाचा दर न देणाऱ्या दूध संघांना बरखास्त करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिला. राज्यात मोफत दूध वाटप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारने गायीच्या दुधासाठी 27 रुपये प्रति लिटर दर निश्चित केला आहे. मात्र, सरकारने ठरवलेला दुधाचा हा दर दूध संघांकडून दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बद्दल आडमुठी भूमिका घेणाऱ्या दूध संघांवर राज्य सरकार कडक कारवाई करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सरकार राज्याचा दुधाच्या एका ब्रँडसाठी आग्रही असल्याचे सांगितले. त्यासाठी 10 बैठका झाल्या मात्र अजूनही निर्णय होऊ शकलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लवकरच कायदा:- दुग्धविकास मंत्री महादेव जानकर
यावेळी पदूम मंत्री महादेव जानकर म्हणाले, राज्यातला दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि दूध पावडरचे दर कोसळल्याने त्याचा परिणाम इथे होत आहे. तरी देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याच्या नोटीसा राज्य सरकारने दूध संघांना पाठवल्या आहेत. संघांनी शेतकऱ्यांना योग्य भाव नाही दिला तर येत्या सहा ते सात दिवसात संघांविरोधात कठोर कारवाईची पावले उचलणार आहे. दूध उत्पादकांना हमीभाव देण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच कायदा करणार असल्याचेही जानकर यांनी सांगितले.
दूध उत्पादकांचे मोफत दूध वाटप आंदोलन 
दुधाला सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रतिलिटर किमान २७ रुपये भाव द्या या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलनाला कालपासून सुरुवात करण्यात आली आहे. लुटता कशाला, फुकटच न्या असे म्हणत दूध उत्पादकांनी मोफत दूध वाटप आंदोलन सुरु केले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. लुटणे थांबवा, शरम नसेल तर ‘फुकटच’ न्या असे ग्रामसभांमध्ये ठराव करत मोफत दूध पुरविण्याचा पवित्रा दूध उत्पादकांनी घेतला आहे.
दिनांक ३ ते ९ मे या काळात राज्यभर चौका चौकात मोफत दूध वाटप सप्ताह आयोजित करण्यात येत आहेत. आंदोलनाच्या तयारीसाठी अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी व बीड जिल्ह्यात दूध उत्पादकांचे जिल्हाव्यापी मेळावे घेण्यात आले आहेत. या जिल्ह्यामध्ये मेळावे घेऊन फुकट दूध वाटप आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे.
भाजपाच्या नेत्यांना प्यायला देणार फुकट दूध!
दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ‘लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणत दुध फुकट वाटण्याचा कार्यक्रम राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरु झाला असून या आंदोलनाच्या अंतर्गत दूध प्यायला खास आमंत्रण दिली जाणार असल्याची माहिती शेतकरी नेते अजित नवले यांनी दिली. भाजपचे आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींना दूध मोफत दिले जाणार असल्याचे नवले यांनी सांगितले. दुधाला सरकारने जाहीर केल्या प्रमाणे प्रतिलिटर किमान २७ रुपये भाव द्या या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलनाला आजपासून  सुरुवात करण्यात आली आहे. लुटता कशाला फुकटच न्या असे म्हणत दुध उत्पादकांनी फुकट दुध वाटप आंदोलन केले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
 दूधाचा अभ्यास करून प्रश्न सोडवा -ज्ञानेश्वर पवार, महानंदचे उपाध्यक्ष.
राज्यात दुधाचा प्रश्न हा गंभीर झाला आहे. राज्यातील दुधाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने दूध प्रश्नाचा अभ्यास करून हा प्रश्न सोडवावा अशी विनंती महानंदचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांनी केली. ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ गायीच्या दुधाला प्रतिलिटर २७ रूपये दर देण्याचा शासनाने आदेश काढले आहेत. शासनाने आदेश काढल्यानंतर दोन महिने २७ रूपये प्रति लिटर दराने महानंदने दूधाची खरेदी केली. मात्र दुधाची परिस्थिती लक्षात घेता २७ रूपये प्रतिलिटर दर देणे परवडत नसल्यामुळे महानंदने देखील सुरूवातीला २१ रूपये दर देणे सुरू केले. त्यानंतर सध्या तर महानंद प्रतिलिटर २० रूपये एवढाच दर दूधाला देत आहे.
शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे दूध दर देणे दूध संघाला परवडत नसल्यामुळे हा दूध दर दिला जात नाही. कर्नाटकात शेतकऱ्यांना दूध दर देता यावा यासाठी राज्य सरकार प्रतिलिटर ७ रूपये मदत शेतकऱ्यांना केली जाते. कर्नाटक सरकारकडून मदत केली जाते. मात्र महाराष्ट्रात फक्त जीआर काढला जातो. या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अभ्यास करूनच या सर्व विषयावर निर्णय घ्यावेत असे  पवार यांनी स्पष्ट केले.
Copy