सर्वसामान्य नागरीकांना न्याय देण्यासह गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार : नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे !

भुसावळ प्रतिनिधी – सर्वसामान्य नागरीकांना न्याय देण्यासह त्यांच्या समस्या सोडवून गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भुसावळचे नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली. बुधवारी त्यांनी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. वाघचौरे यांची संगमनेर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथून पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर बुधवारी त्यांनी भुसावळ विभागाचा पदभार स्वीकारला.

याप्रसंगी भुसावळ डीवायएसपी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले तसेच उपअधीक्षक वाघचौरे यांनीही त्यांचे बुके देवून करीत पदभार सोपवला. भुसावळ शहरात बदली झाल्यानंतर पिंगळे यांनी सर्वात आधी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करण्यासह गुन्हेगारीला अंकुश लावण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, आतापर्यंत उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांनादेखील प्राधान्य देवून हे गुन्हे उघडकीस आणले जातील शिवाय चोऱ्या घरफोड्यांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी पोलीस आता रात्रीचा खडा पहारा देतील शिवाय प्रभावी गस्त घालतील व स्वतः आपण रात्रीची सरप्राईज व्हिजीट करून गस्त तपासू, असेदेखील पिंगळे यांनी सांगितले. ईस्लामपूर येथे पोलीस उपअधीक्षक असताना कृष्णात पिंगळे यांनी माणुसकीचं नातं हा उपक्रम सुरू केल्यानंतर नागरीकांनी त्यांना उपक्रम सुरू केल्यानंतर नागरीकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. सुमारे 92 लाखांचा निधी उभारून त्यांनी ‘गरीबांच्या तोंडात भरवलेला घास’ राज्यात कौतुकाचा विषय ठरला होता.

कायदा-सुव्यवस्था राखण्यासह गुन्हेगारीला अंकुश लावण्यासोबत सामाजिक बांधिलकीदेखील जपण्याचे कार्य पिंगळे यांनी केले आहे.

यापुढेदेखील मोबाईल कॉलवर सदैव उपलब्ध राहणार – पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे

सुमारे अडीच वर्षांपूर्वी शहराचा पदभार घेतल्यानंतर शहराच्या कायदा- सुव्यवस्थेला प्राधान्य दिले. सर्वसामान्य नागरीकांना केंद्रबिंदू मानून न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच अडीच वर्षांच्या कारकिर्दीत भुसावळकरांचे प्रेम लाभले, पत्रकारांचे चांगले सहकार्य लाभले, अनेक सामाजिक कार्यक्रमातही भाग घेता आला व खुनांची मालिका, जबरी चोरी, गोळीबार यावर प्रकर्षाने नियंत्रण मिळवल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी यावेळी सांगितले. भुसावळकरांचे आभार मानता कायम प्रेमात राहू इच्छितो व यापुढेदेखील मोबाईल- कॉलवर सदैव उपलब्ध राहणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक कार्यालयासह बाजारपेठ पोलीस ठाण्यातर्फे त्यांना बुधवारी निरोप देण्यात आला.