‘इन्फोसिस’चे सीईओ विशाल सिक्का यांचा राजीनामा

63

मुंबई : इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर आता यू .बी. प्रवीण राव इन्फोसिसचे प्रभारी सीईओ म्हणून नियुक्त झाले आहेत.

विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर शेअर बाजारात 200 अकांची घसरण झाली असून इन्फोसिसच्या शेअरमध्ये 4 टक्के घट झाली आहे. 2014 साली कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विशाल सिक्का यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती. इन्फोसिसमध्ये 2014 पर्यंत सह-संस्थापक असणाऱ्यांनीच कंपनीचं नेतृत्व केलं होतं. पण विशाल सिक्का हे पहिलेच असे सीईओ होते की जे इन्फोसिसचे सह-संस्थापक नव्हते.

कोण आहेत विशाल सिक्का?

विशाल सिक्का यांनी बडोदाच्या एमएस विद्यापीठातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली. इन्फोसिसमध्ये येण्याआधी सिक्का हे जर्मनीतील सॅप कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यकारी सदस्य होते. तिथं त्यांच्यावर उत्पादनांची जबाबदारी होती. ज्यामध्ये क्लाउड अॅप्लिकेशन, अॅनालिटिक्स, मोबाइल यांचा समावेश होता.

दरम्यान, उद्या इन्फोसिसच्या संचालक मंडळाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत इन्फोसिसनं जाहीर केलेल्या समभाग पुनर्खरेदी अर्थात शेअर्स बायबॅक कार्यक्रमाची रुपरेषा ठरवली जाणार आहे. याच बैकीत बायबॅकची किंमतही ठरवण्यात येईल.

Copy