VIDEO महाड दुर्घटना: ‘देव तारी त्याला कोण मारी’; १९ तासानंतरही चिमुरडा सुखरूप

0

महाड: रायगड जिल्ह्यातील महाड येथील काजळपुरामध्ये काल एक इमारत कोसळली. या इमारत दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी आहेत. तीन माजली इमारत पूर्णत: जमीनदोस्त झाली. दरम्यान या दुर्घटनेबद्दल संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान याठिकाणी बचाव आणि मदतकार्य सुरु आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी बचावकार्य करत आहे. विशेषबाब म्हणजे या ठिकाणी एका चारवर्षीय बालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची या ठिकाणी प्रत्यय आला. तब्बल १९ तासानंतरही हा जिवंत होता. त्याला चिमुकला सुखरूप बाहेर काढण्यात आले असून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मोहम्मद बांगी असे या चिमुरड्याचे नाव आहे.

आतापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. काल सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास तारिक गार्डन इमारत कोसळली. अद्याप ढिगाऱ्याखाली १५ पेक्षा जास्त जण अडकलेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा शोध एनडीआरएफकडून सुरू आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत आवश्यक मदतीचे आश्वासन दिले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी देखील प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देत जखमींना मदतीचे आदेश दिले आहे.