उर्मिला मातोंडकरांचा उद्या शिवसेनेत प्रवेश

0

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिवसेनेकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाले होते. दरम्यान उर्मिला मातोंडकर उद्या सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०१९ ची लोकसभा काँग्रेसकडून निवडणूकही लढवली होती. गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पदांसाठी १२ जणांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. यामध्ये शिवसेनेने उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे-पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वणकर यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांना संधी दिली आहे.

Copy