टूलकिट प्रकरण: दिशा रवीला जामीन मजूर

0

नवी दिल्ली: दिल्ली सीमेवर केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला विरोध म्हणून शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर दिशाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिशाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांनी दिशाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांनी मागणी फेटाळून लावत दिशाला जामीन मंजूर केला.

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, शेतकरी आंदोलनासंदर्भातील एक टूलकिट स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात दिशा रवी हिला बंगळुरूतील तिच्या घरून अटक केली होती. अटक केल्यानंतर दिशाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस कोठडी एका दिवसाने वाढण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांनी आज दिशाला पटियाला हाऊस सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायाधीश धर्मेंदर राणा यांनी दिशाला दोन हमीदारांसह एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Copy