मध्य प्रदेश, मिझोरममध्ये मतदानाला सुरुवात !

0

भोपाळ-मध्य प्रदेश आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये आज मतदान होत असून सकाळी ८ वाजेपासून येथे मतदानाला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात २३० जागांसाठी मतदान होत असून येथील २८९९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. त्याचबरोबर मिझोराममध्ये ४० जागांसाठी मतदान होत आहे. येथे ७.७० लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मध्य प्रदेशात २३० विधानसभा जागांसाठी २८९९ उमदेवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये २६४४ पुरुष, २५० महिला आणि ५ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. २२७ विधानसभा मतदारसंघात सकाळी ८ ते ५ या वेळेत मतदान होणार आहे. तर बालाघाट जिल्ह्यातील तीन नक्षलप्रभावित विधानसभा मतदारसंघातील परसवाडा, बेहर आणि लांजी येथे सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदान होणार आहे.

एकूण ५,०४,९५,२५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात २,६३,०१,३०० पुरुष, २,४१,३०,३९० महिला आणि १३८९ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ६५००० मतदारांनी पोस्टल मतदान यापूर्वीच केले आहे. उर्वरित ५,०४,०३३,०७९ मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संपूर्ण राज्यात ६५३६७ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. यातील १७००० मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहे. येथे केंद्रीय पोलीस दल आणि वेबकास्टिंगसह मायक्रो पर्यवेक्षकही तैनात करण्यात आले आहेत. सर्व मतदान केंद्रावर मतदानासाठी इव्हीएमसह व्हीव्हीपॅटचा उपयोग केला जाईल.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्य लढत ही भाजपा आणि काँग्रेसदरम्यान होत आहे. भाजपा सलग १५ वर्षांपासून राज्यात सत्तेवर आहे. चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून कसून प्रयत्न केले जात आहेत. तर काँग्रेसला राज्यातील मागील १५ वर्षांपासून गेलेली सत्ता मिळवायची आहे.

Copy