शेतकरी आंदोलनावरून राज्यसभेत गोंधळ; आपचे तीन खासदार निलंबित

0

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय होत नसल्याने आंदोलन सुरूच आहे. २६ जानेवारीला आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. दरम्यान सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यात देखील शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटत आहे. आज बुधवारी ३ फेब्रुवारी रोजी राज्यसभेत शेतकरी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या ३ खासदारांना निलंबित करण्यात आले. एका दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे. आपचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वेलमध्ये पोहचले, आप खासदारांच्या घोषणाबाजी आणि गोंधळाला पाहून सभापतींनी त्यांना त्यांना निलंबित केले. संजय सिंह, सुशील गुप्ता आणि एनडी गुप्ता असे तिन्ही खासदारांचे नाव आहेत. या ३ खासदारांनाआपच्या खासदारांना मार्शलच्या मदतीने सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.

कृषी विधेयकांना मागे घेण्यासाठी आणि शेतकरी मुद्द्यावरून राज्यसभेचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते, पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर गोंधळ सुरु झाला.

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर कामकाज तहकूब करण्याची नोटीस देण्यात आली आहे. कॉंग्रेसतर्फे खासदार जसबीर सिंग, खासदार गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी कामकाज तहकूब ठेवण्याची नोटीस सादर केली. बसपा, सीपीआय, टीएमसी, द्रमुक, सीपीआय-एम यांनीही तहकूब करण्याचा प्रस्ताव दिला.

 

Copy