भाजपच्या अंतर्गत वादामुळे अमळनेरात तिसऱ्यांदा पराभव

0

अमळनेर: केंद्रात तसेच राज्यात भाजपाची सत्ता असतांना अमळनेर विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमळनेर विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून आयत्यावेळी अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे देखील कार्यकर्ते सक्रीय होऊ शकले नाही.

स्मिता वाघ यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते

लोकसभा निवडणुकीत विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर झाले होते, पण आयत्यावेळी तिकीट चाळीसगावचे आ. उन्मेष पाटील यांना लोकसभेचे तिकीट मिळाले, या मुळे सुद्धा नाराजी होती. विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणे अपेक्षित असताना अमळनेर मधून अपक्ष राहिलेले आ. शिरीष चौधरी यांना तिकीट दिले गेले. यामुळे भाजपाचे जुने कार्यकर्ते दुखावले गेले असल्याचे अमळनेर शहरात बोलले जात आहे.

कारणमीमांसा करणे गरजेचे

आगामी काळात मतदारसंघ विरोधी पक्षात जाऊन बसला तर मतदारसंघात विकास कामे होतील की नाही अशी देखील शंका वर्तवली जात आहे. तरी या सर्वच गोष्टींची कारणमीमांसा करण्याची वेळ भाजपाचे संकट मोचक म्हणून परिचित असलेले गिरीश महाजन यांच्यावर येऊन ठेपलेली आहे. अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी प्रतिक्रीया घेण्यासाठी आ. स्मिता वाघ यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही.

Copy