एक लाखांवर उत्पन्न असलेल्यांच्या शिधापत्रिका होणार रद्द

बोगस शिधापत्रिकाधारकांचा पर्दाफाश होणार; जिल्हा पुरवठा विभागातर्फे तपासणी मोहीम

0

जळगाव – जिल्ह्यात चारचाकी, बंगलेवाले देखील शासकीय धान्य वितरणाचा लाभ घेत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक आहे, असेही लाभार्थी म्हणून यादीत समाविष्ट आहेत. त्यामुळे अशा अपात्र शिधापत्रिकारधारकांचा (ration card) शोध घेऊन त्यांचा जिल्हा पुरवठा विभागातर्फे पर्दाफाश केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हाभरात पुरवठा विभागातर्फे 30 एप्रिलपर्यंत तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.

गोरगरिबांच्या हक्काचे धान्य लाटणार्‍या बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. त्यासाठी जिल्हाभरातील शिधापत्रिकाधारकांची तपासणी केली जाणार आहे. 30 एप्रिलपर्यंत ही तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. आत्तापर्यंत अनेक धनदांडगे गोरगरीबांच्या हक्काचे धान्य लुटत आहेत. अशांना चाप बसविण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे संपुर्ण जिल्ह्यात ही मोहिम राबविली जात आहे.

शिधापत्रिका धारकांची माहिती गोळा होणार

जिल्ह्यात तपासणी मोहिम राबवून शिधापत्रिकाधारकांना एक अर्ज दिला जाणार आहे. या अर्जात कुटुंबाची संपूर्ण माहिती आणि उत्पन्नाचीही माहिती द्यावी लागणार आहे. ज्यांच्याकडे चारचाकी, गॅस जोडणी आहे अशांसह बँकांच्या खात्यांची तपासणी केली जाणार आहे. संशयास्पद वाटणार्‍या शिधापत्रिकांची पोलिसांमार्फत तपासणी केली जाणार आहे.

30 एप्रिलपर्यंत शिधापत्रिका तपासणी मोहीम

शिधापत्रिका तपासणी मोहिमेदरम्यान उत्पन्नाच्या स्त्रोतांचाही शोध घेतला जाणार आहे. यात एक लाखांच्या वर उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका थेट रद्द केल्या जाणार आहेत. 30 एप्रिलपर्यंत ही मोहीम राबविली जाणार असल्याने आता बोगस शिधापत्रिका धारकांचा पर्दाफाश होणार आहे.

जिल्ह्यात अनेक गोरगरीब गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे, असा आमचा प्रयत्न आहे. काहींनी माहिती लपवून गोरगरिबांच्या हक्काचे धान्य घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या मोहिमेच्या माध्यमातून खर्‍या आणि वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून दिला जाईल.

सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव

Copy