आशादायक: कोरोना ओसरतोय; रुग्ण संख्येत प्रचंड मोठी घट

0

नवी दिल्ली: भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून रुग्ण संख्या घटतांना दिसत असल्याने आशादायक स्थिती निर्माण झाली आहे. दिवसाला ८५ ते ९० हजारापेक्षा अधिक आढळून येणाऱ्या रुग्ण संख्येत आता घट झाली आहे. यावरून कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरातांना दिसत आहे. मागील २४ तासात आतापर्यंतची गेल्या दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. प्रचंड मोठी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे.

गेल्या २४ तासात देशात ५५ हजार ३४२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर पोहोचली आहे. यात ८ लाख ३८ हजार ७२९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ६२ लाख २७ हजार २९६ रुग्ण उपचाराच्या मदतीनं करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात आतापर्यंत १ लाख ९ हजार ८५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल सोमवारी १२ ऑक्टोबरला करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले होते. सोमवारी देशात ६६ हजार ७३२ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ८१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत आज आलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. विशेष म्हणजे खूप मोठ्या कालावधीनंतर इतकी प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे.