Private Advt

बिहारमध्ये सर्वाधिक गरिबी

नवी दिल्ली : राष्ट्रीय नीती आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या गरिबी निर्देशांक अर्थात पॉव्हर्टी इंडेक्सची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक गरीब लोकसंख्या बिहारमध्ये राहाते. बिहारखालोखाल या यादीमध्ये झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. नीती आयोगाने यासंदर्भात सादर केलेल्या अहवालामध्ये सर्वात वरच्या स्थानी बिहार आहे. बिहारमध्ये एकूण ५१.९१ टक्के म्हणजे जवळपास ५२ टक्के नागरीक गरीब असल्याचं समोर आलं आहे. त्याखालोखाल झारखंड (४२.१६ टक्के), उत्तर प्रदेश (३७.७९ टक्के), मध्य प्रदेश (३६.६५ टक्के) तर पाचव्या क्रमांकावर मेघालय (३२.६७ टक्के) ही राज्य आहेत.

दरम्यान, सर्वाधिक गरीब लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक १७वा लागतो. महाराष्ट्रातील एकूण १४.८५ टक्के लोकसंख्या गरीब असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्रानंतर तेलंगणा (१३.७४ टक्के), कर्नाटक (१३.१६ टक्के), आंध्र प्रदेश (१२.३१ टक्के) आणि हरियाणा (१२.२८ टक्के) या राज्यांमधील गरीब लोकसंख्येची टक्केवारी दोन अंकी संख्येमध्ये आहे.