Private Advt

शेतकरी मदतीचा प्रस्ताव राज्यपालांना पाठविणार

0

जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत ठराव मंजूर


जळगाव: अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे पंचनामे प्रशासकिय स्तरावर सुरू असून, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीची मदती मिळावी यासाठीचा प्रस्ताव राज्यपालांना पाठविण्याचा ठराव आजच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला.जिल्हा परिषदेची गेल्या महिन्यातील तहकुब सभा आज आयोजित करण्यात आली होती. जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील आणि उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन उपस्थित नसल्याने ही तहकुब सभा शिवसेनेचे गटनेता रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला नानाभाऊ महाजन, प्रताप पाटील या दोन सदस्यांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणदीवे व विभाग प्रमुख उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीची मदत करण्याचा प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असल्याने प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे पाठविण्याचा ठराव करण्यात आला. तसेच रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ मदत दिली जात होती. मात्र राज्यात मुख्यमंत्री नसल्याने ही मदत मिळत नसल्याने रूग्णांना तात्काळ मदत राज्यपाल सहाय्यता निधीतून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठविण्याचा ठराव देखील सभेत करण्यात आला.

जि.प. मालकीच्या नुकसानीचेही पंचनामे

अतिवृष्टीमध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींचे देखील नुकसान झाले आहे. यात रूग्णालय, शाळा, अंगणवाडी यांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामुळे जि.प. मालकीच्या नुकसान झालेल्याचे पंचनामे करण्याचे आदेश जि.प. प्रशासनाने काढावे. तसेच यासंदर्भातील माहिती 6 डिसेंबरपर्यंत सादर करण्याच्या सुचना विभाग प्रमुखांना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या ग्रामनिधीतून ग्रामपंचायतींना 21 कोटी रूपयांचे कर्ज देण्यात आले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात कोणत्याही प्रकारची वसुली झालेली नाही. तसेच पाणी पुरवठ्याची दहा कोटी रूपयांचे बिल थकले असून याची देखील वसुली झाली नसल्याचे नानाभाऊ महाजन यांनी सभेत सांगितले. यामुळे वसुली करण्याच्या सुचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

तीनच सदस्यांच्या उपस्थितीत सभा

स्थायी समितीची तहकुब सभा एक वाजता असताना पदाधिकारी व स्थायीचे सदस्य उपस्थित नव्हते. तहकुब सभा घेण्यासाठी कोरमची आवश्यकता नसल्याने सभागृहात उपस्थित रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नानाभाऊ महाजन व प्रताप पाटील यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यानंतर नियमित सभेचे कामकाज अडीच वाजता उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यात विषय सुचीवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.