पराभव अनाकलनीय ; पंकजा मुंडे

0

परळी : परळी मतदार संघामधून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडेचा पराभव केला आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी जवळपास 20 हजार मतांनी विजय मिळवला. मतदान झाल्यानंतरही बीडमधल्या घडामोडी लक्षवेधी ठरल्या होत्या. मुंडे बंधू भगिनींनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे ही लढत राज्यासाठी लक्षवेधी ठरली. पंकजा मुंडे मंत्री होत्या. त्यामुळे त्यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. खुद्द पंकजा यांनीदेखील निकालानंतर तशीच भावना बोलून दाखवली. आपला पराभव मान्य करत त्यांनी अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपानं स्वबळावर सत्ता मिळवत 300 चा आकडा पार केला. त्यावर ‘अनाकलनीय’ अशा एका शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. पंकजा मुंडेंनीदेखील याच शब्दाचा वापर करत त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचं म्हणत कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असं आवाहन त्यांनी केलं. बीड जिल्ह्यातील राजकारणाचा वेगळा चेहरा निवडणुकीत पाहायला मिळाल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं.

बीडच्या परळीत मुंडे बंधू भगिनी आमनेसामने असल्यानं राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं. प्रचारादरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी एकमेकांवर तोफ डागली होती. प्रचार संपल्यानंतरही दोघांमधली धुसफूस कायम होती. यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यात धनंजय मुंडेंनी आधीपासूनच आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवत पंकजा मुंडेंचा मोठा पराभव केला.

Copy