फिरायला गेलेल्या वृध्दाचा मेहरूण  तलावात आढळला मृतदेह 

जळगाव | प्रतिनिधी 

जळगाव शहरातील जगवानी नगरातील एका ६० वर्षीय व्यक्तीचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. बबन नामदेव पवार (वय ६३, रा. जूनी वसाहत, जगवानी नगर, जळगाव) असं मयत वृध्दाचे नाव आहे. सायंकाळी ते घराबाहेर पडले आणि रात्री थेट त्यांची मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बबन नामदेव पवार हे आपल्या पोलीस कर्मचारी असलेल्या मुलगा आणि सून यांच्यासोबत जगवानी नगरात वास्तव्याला होते. बबन पवार हे बुधवारी सायंकाळी घराबाहेर पडले. गुरूवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मेहरूण तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या काही वन्यजीव पथकातील काही सदस्यांना त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. सुरूवातीला वन्य जीव पथकातील राजेश सोनवणे, रविंद्र भोई, अजीब काझी यांनी पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी समाधान टहाकळे आणि विकास सातदिवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मयताच्या खिशातील कागद पत्राच्या आधारे त्यांची ओळख पटली. बबन नामदेव पवार असं नाव निष्पन्न झाल्यानंतर घटनेची माहिती त्यांचा मुलगा विकास पवार यांना देण्यात आली. सायंकाळपासून घरून निघालेल्या बापाची दुसऱ्या दिवशी थेट मृत्यूची बातमी ऐकून विकास पवार यांनी हंबरडा फोडला. बबन पवार तलावात कसे व कोणत्या कारणाने बुडाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी समाधान टाहकळे करी आहेत.