बहिणीची छड काढल्याच्या रागातून भावाने केला होता मित्राचा खून

धुळ्याच्या आरोपीला औरंगाबादेतून अटक

धुळे |प्रतिनिधी

शहराजवळील मोहाडी गावाजवळील एका शेतात काल अज्ञात इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ज्या व्यक्तीचा खून करण्यात आला होता, त्याचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले होते. अगदी क्रूर पद्धतीने करण्यात आलेल्या खुनाचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत छडा लावला असून यात 21 वर्षीय आरोपीला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे.
धुळे शहराजवळील मोहाडी परिसरात एका अज्ञात इसमाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या खुनाचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत छडा लावला असून या घटनेतील मयत सतीश बापू मिस्तरी (वय वर्ष 22) हा चेतन प्रताप गुजराती (वय वर्ष 21) याच्या बहिणीची छेड काढत असल्याच्या कारणावरून चेतन गुजराती याने सतीश मिस्तरी याचा निर्घृण खून केल्याची कबुली दिली आहे.

याप्रकरणी खुनातील मुख्य आरोपी चेतन प्रताप गुजराती या 21 वर्षीय आरोपीला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली असून याच खूनातील दुसरा संशयित आरोपी विधी संघर्ष बालक याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बहिणीची छेड काढण्याच्या रागातून मित्रानेच मित्राचा गळा चिरून खून केल्याच्या धक्कादायक घटनेचा छडा मोहाडी पोलिसांनी 24 तासांत लावला.