आकुर्डीत खान्देश मराठा पाटील समाज संघाचा वर्धापनदिन उत्साहात

समाजातील उत्कृष्ट कामगीरी बजावणा-या मान्यवरांचा विविध पुरस्काराने सन्मान

पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | प्रत्येकाला वाटतं शिकून सवरून नोकरी करावी, स्वत:चा मोठा उद्योग उभारावा, नामांकित कंपन्यात काम करावं. परंतु, ग्रामीण भागात पुरेशा सोयी सुविधा नसल्याने अनेकांची स्वप्न धुळीस मिळतात. त्यामुळे कामधंदा व नोकरीच्या शोधात खान्देशातील तरूण वर्ग तसेच शेतकरी कुटुंबे पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक क्षेत्राकडे येत असतात. सुरवातीला कुठलाही आधार मिळत नाही. नैराश्य निर्माण होते. या नैराश्येच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी गावाकडून आलेल्या प्रत्येकाच्या मदतीसाठी आपण स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे मत चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले. खान्देश मराठा पाटील समाज संघाच्या वर्धापनदिनानिमीत्त आकुर्डी येथे आयोजित कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. समाजाकडून पुरस्कार मिळणे यापेक्षा मोठी गौरवाची बाब नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पुणे महानगरपालिका उपायुक्त प्रतिभा पाटील होत्या. तसेच माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मा.नगरसेवक राहूल कलाटे, मोरेश्वर भोंडवे, उद्योजक दीपक पाटील, मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव शंकर पाटील, मंडळाचे कार्यध्यक्ष उद्योजक शरद पाटील, सहकार्याध्यक्ष पंकज निकम, संचालक मोतीलाल भामरे, प्रदीप शिरसाठ, देविदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी, हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलांना आयएएस अधिकारी बनविण्याचे स्वप्न सत्यात उतरविल्याबददल श्री. प्रभाकर(अण्णा) काशीनाथ पाटील व सौ. इंदुबाई पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार” पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच, आमदार मंगेश चव्हाण यांना “समाजभूषण पुरस्कार” देवून यावेळी सन्मानित करण्यात आले.

प्रतिभा पाटील म्हणाल्या, समाजात मुलींचे शिक्षण झाले की त्यांच्या लग्नाचा विचार आई वडीलांना सतावतो. पण, मुलांप्रमाणेच मुलीदेखील कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत, याकडे कोणीच लक्ष देत नाही. आमच्या आई वडीलांनी आम्ही अधिकारी व्हावे, देश सेवेची मुठ बांधावी. यासाठी नेहमीच पाठींबा दिला. त्यामुळे भाऊ राजेश पाटील (आयएएस) आणि मी एमपीएससीची परीक्षा देवून उत्तीर्ण झाले. फक्त शिक्षण आणि मुलांचे लग्न या पलिकडे पालकांनी पाहायला हवं, अस सांगून मुलींच्या शिक्षणासह त्यांची जमेची बाजू ओळखायला हवी, असेही त्यांनी सांगितले. माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, राहूल कलाटे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

प्रसंगी, विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बचावणा-या १३ मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये राहुल देसाई – उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार, डॉ. शीतलकुमार रवंदळे – शिक्षण रत्न पुरस्कार, ऍड. भुषण पाटील – सामाजिक न्याय भूषण पुरस्कार, प्रशांत पाटील – शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, हिरामण भांमरे – अर्थ भूषण पुरस्कार, हेमंत पाटील – उद्योजक पुरस्कार, मनोज पाटील – उद्योगरत्न पुरस्कार, भारती बोरसे – सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, गुलाब पाटील – उद्योगरत्न पुरस्कार, देवीदास पाटील – सामाजिक कार्यगौरव पुरस्कार, मनोज पाटील – युवा उद्योजक पुरस्कार, जितेंद्र पाटील- उद्योगरत्न पुरस्कार, कु. रोहिणी पाटील हिला उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच, कार्यक्रमावेळी लकी ड्रॉ द्वारे कुपन विजेत्या महिलांचा पैठणी देवून सत्कार करण्यात आला.

त्यानंतर, “कर मन लगन” या खान्देशी गाण्याचा फेम विनोद कुमावत आणि “हाई झुमका वाली पोर” गाण्याची फेम राणी कुमावत तसेच, मिमीक्री स्टार विलास सिरसाठ यांनी विविध अहिराणी गीतांवर नृत्य सादरीकरणाने उपस्थित सर्वांची मने जिंकली. प्रास्ताविक अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले. सुत्रसंचालन भरत बारी तर आभार शंकर पाटील यांनी मानले.