कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली ॥

आज वैशाख वद्य दशमी. रविवार, दि. १४ मे २०२३ रोजी श्री क्षेत्र मेहूण (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील तापीतीरावर संत आदीशक्ती मुक्ताई याच दिवशी शके १२१९ मध्ये गुप्त झाल्या. त्या घटनेला ७२६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संत मुक्ताईंच्या तिरोभूत (गुप्त) होण्याच्या प्रसंगाची माहिती देणारा हा लेख…

संत ज्ञानेश्‍वरादी भावंडांनी जगाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला. साक्षात श्रीमहादेव, श्रीविष्णू, श्रीब्रह्मा व श्रीआदीशक्ती यांनी संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्‍वर, संत सोपानदेव आणि संत आदिशक्ती मुक्ताई यांच्या रूपाने अवतार घेतल्याचे संत जनाबाईंनी आपल्या अभंगात म्हटले आहे. आपले अवतार कार्य संपल्यानंतर संत ज्ञानेश्‍वरांनी शके १२१८ मध्ये २१ वर्षे, ३ महिने ५ दिवसांचे असतांना आळंदी येथे समाधी घेतली. संत सोपानदेवांनी शके १२१८ मध्ये १९ वर्षे, १ महिना १३ दिवसांचे असतांना सासवड येथे समाधी घेतली. संत निवृत्तीनाथांनी शके १२१९ मध्ये २३ वर्षे, ४ महिने ११ दिवसांचे असतांना त्र्यंबकेश्‍वर येथे समाधी घेतली. संत मुक्ताई यांनी समाधी घेतली नसून त्या तापीतीरी गुप्त झाल्या आहेत. त्याला संत नामदेव महाराज यांच्या अभंगांच्या पुरावा आहे.

जेव्हा संत मुक्ताई यांच्या गमनाचा प्रसंग आला, पांडुरंगांनी चौथी मुक्ताई नेमियेली तापी असे गुप्तपणे सांगितले. त्यानंतर आता हे शरीर रक्षु नये असे संत मुक्ताईंना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला. हे पाहून संत निवृत्तीनाथ तळमळू लागले. हा सर्व संतांचा मेळा पांडुरंगासह तापीतीरावर जावू लागला. त्यावेळी संत नामदेवांनी पांडुरंगाला तातडीने कोठे जात आहात, कोणते स्थह नेमियेले आहे असे विचारले. त्यावर पांडुरंगांनी, तापीचिये तिरी महत्ग्राम थोर | असे सोमेश्वर पुरातन ॥ असे सांगितले. परशुरामाने तेथे बाण मारलेला आहे. त्यानुसार सर्व संतमंडळी तापीतीरावर आली.  धन्य तापीतीर दिसे मनोहर, दोही थडीभार पताकांचे, संत नामदेवांना तर ते स्थळ फारच पसंत पडले. म्हणून ते म्हणतात, नामा म्हणे हरी आवडीचे स्थळ, कण्हेर कमळ उदय झाला. शिवाय वसंत ऋतु असल्यामुळे तेथील आम्रवृक्ष, मैलागिरी, चंदन, पारिजातक, सोनचाफे, जांभळी, रामफळी, सिताफळी, करंज, केळी, कर्दळी, कमळे, कण्हेर वगैरे झाडे फलपुष्पभाराने व लतावेलींनी गजबजून गेली होती. त्या लतावृक्षामध्ये मयूर टाहो देत होते. कोकिळा सुस्वर गायन करीत होत्या आणि श्‍वेत, पीत, रक्तवर्णांच्या अशा निरनिराळ्या भ्रमरांचे गुंजारव वैष्णवांना ऐकावयास येत होते. त्यामुळे तेथील शोभा अत्यंत मनोहर दिसत होती. खान्देशातील चैत्र-वैशाखाचा कडक उन्हाळा व गगनचुंबीत वृक्षांची घनदाट छाया अत्यंत आल्हाददायक वाटत होती. ऋषी, तपस्वी व योगीजन यांचे ठिकठिकाणी आश्रम असल्यामुळे तेथील रमणीयता विशेष खुलून दिसत होती. म्हणून प्रत्येकाच्या मुखातून मधुरध्वनी निघू लागले, धन महत्नगर धन्य सोमेश्‍वर | धन्य तापीतीर योगियांचे ॥ या पुण्यभुमीत मार्कंडेय ऋषी, श्रृंगऋषी आदींनी तपश्‍चर्या केली आहे. तसेच योगीश्रेष्ठ चांगदेवराय व त्यांच्या समकालीन असलेल्या योगीजनांच्या योगाभ्यासाला अत्यंत अनुकूल असे निवांतरम्य स्थळ होते. म्हणून नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे देवा भला हा एकांत | मार्कंडेय येथ तप केले ॥ याप्रमाणे सृष्टीसौंदर्याची शोभा पाहता पाहता व कीर्तनभजनाचा आनंद अनुभवत असतांना एक आठवडा केव्हा निघून गेला हे कळलेही नाही. संत मुक्ताईंच्या जाण्याची वेळ जवळ येत असल्याने सर्व सुरवरांचा समुदाय तापीतीरी जमू लागला. गंधर्व सुस्वर गाणी गाऊ लागले. देवादिक एकामेकांमध्ये संत मुक्ताई यांच्या गमनाविषयी नेत्रसंकेत करू लागले. जसाजसा संत मुक्ताईंच्या जाण्याचा प्रसंग जवळ येत होता तसतशी सर्वांनाच चिंता वाटत होती. विधीच्या संकेतानुसार वैशाख वद्य दशमीच्या दिवशी सर्व संतमंडळी स्नानासाठी तापीतीरावर आली. यावेळी जिकडे तिकडे वीणामृदंगाचे झणत्कार होवू लागले. भगवंताच्या नामाच्या गजराने व जयजयकाराने परिसर दणाणू लागला. स्नान आटोपून तापीतीरावरच सर्व संतमंडळी भजन करू लागली. वैशाख वद्यचा शेवटचा आठवडा असल्यामुळे एकाएकी विजांचा कडकडाट सुरू होवून चारही दिशा कंपायमान होवू लागल्या. आता आकाश कोसळून पडते कि काय अशी भिती वाटू लागली. भयंकर वारा सुटून पृथ्वी थरथर कापू लागली. आकाश काळ्याकुट्ट मेघांनी भरून आले. सगळ्यांचे डोळे घट्ट झाकल्यासारखे झाले. कोणीच कोणाला दिसत नव्हते. यावेळी मुक्ताईला सांभाळा, मुक्ताईला सांभाळा, असे संत निवृत्तीनाथ, पांडुरंग, रूक्मिणी हे सर्व म्हणू लागले. कोणालाच कोणाची शुद्ध राहिलेली नव्हती. अशा परिस्थितीत,
कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली ॥
आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यावेळी निरंजनस्वरूप आदीशक्ती मुक्ताई एकाएकी अदृश्य झाल्या. सगळीकडे वातावरण शांत झाले. विजेचा कडकडाट शांत झाला. आकाशातील अभ्रे नाहीशी झाली. मात्र त्यानंतरही सर्वत्र त्रिभुवनात एक प्रहरपर्यंत प्रकाश होता. शके १२१९ मध्ये वैशाख वद्य दशमीच्या दिवशी महत्नगर म्हणजेच सध्याचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र मेहूण येथील तापीतीरावर १७ वर्षे, ७ महिने, २४ दिवसांच्या असतांना संत मुक्ताई गुप्त, तिरोभूत झाल्या. संत मुक्ताईंचे हे पवित्र तिरोभूत स्थळ सुमारे ६५० वर्षे अज्ञात होते. परंतु संत नामदेवांनी यांनी रचलेल्या तिरोभूत प्रसंगांच्या अभंगांचा आधार घेवून हे पवित्र तिर्थक्षेत्र शोधून काढण्यात आले. याच तिर्थक्षेत्रावर आज दि. १४ मे २०२३ रोजी संत आदीशक्ती मुक्ताई यांचा ७२६ वा तिरोभूत सोहळा संपन्न होत आहे.