एनआरएमयुची रेल्वे खासगीकरणाविरोधात जोरदार निदर्शने

1

भुसावळ : केंद्र सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात रेल्वेचे खासगीकरण होत असल्याच्या निषेधार्थ नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे महामंत्री वेणु.पी.नायर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार भवनापासून मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयावर भव्य रॅली काढून नुकतेच निदर्शने करण्यात आली.

रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करू नये, रेल्वेगाड्या कंत्राटदाराला चालवू देणार नाही, कारखान्यांचे खाजगीकरण बंद करावे, खाजगीकरण करून कामगारांना गुलामाप्रमाणे वागवणे बंद करावे, नवीन पेन्शन स्कीम बंद करावी, महिला कर्मचार्‍यांना कामाच्या ठिकाणी सर्व सुविधा पुरवाव्यात, रेल्वे वसाहती, रुग्णालय व शाळांमध्ये सुधारणा कराव्या, रीक्त जागा तत्काळ भराव्या, रेल्वे वसाहतींची जागा खाजगी उद्योगांना देऊ नये, तिकीट आरक्षण कार्यालयाचे काम आयआरसीटीसीला देऊ नये आदी मागण्यांसाठी निदर्शने करून मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या सभेत मंडळ सचिव आर.आर.निकम, मंडळ अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, मुख्यालय कार्यकारी अध्यक्ष ए.बी.धांडे, सहाय्यक मंडळ सचिव जी.जी.ढोले, मंडळ कोषाध्यक्ष टी.आर.पांडव यांनी सभेला संबोधित केले. भविष्यात रेल्वेचा मागण्या घेऊन होणार्‍या या आंदोलनाला तयार राहण्यास सांगितले. यशस्वीतेसाठी अलका चौधरी, महिला अध्यक्षा अलका चौधरी, सुनंदा डांगे, योगेश बारी, वसंत शर्मा, बापू पाटील, भवानी शंकर, ललित भारंबे, दीपक सूर्यवंशी, डी.यु.कोळी, अनिल मिसाळ, ख्वाजा आरीफुद्दीन, व्ही.एस.पाटील, गुरुदत्त मकासरे, ए.टी.खंबायत, श्याम तळेकर, आर.पी.भालेराव आदींनी परीश्रम घेतले.

Copy