हिंदुंसाठी भारतातील मुस्लिमांनी गोमांस खाणे सोडावे

0

जयपूर । गोमांसबंदीवरुन गदारोळ सुरु असतानाच अजमेर शरीफ दर्ग्याच्या धर्मगुरुंनी गोमांस खाणार नाही असा निर्धार केला आहे. गोमांसमुळेच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होत असल्याने भारतातील प्रत्येक मुस्लिमाने गोमांस खाणार नाही अशी शपथच घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. अजमेर शरीफ दर्ग्यातील मुख्य धर्मगुरु दिवान सईद जैनूल अबेदीन यांनी गोमांसबंदीचे समर्थन केले. ख्वाजा चिश्ती यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमात ते बोलत होते.

सुधारित कायद्याचेही समर्थन
हिंदू हे आपल्या बहीण- भावाप्रमाणे आहेत. आपण गोमांस खाल्याने त्यांच्या धार्मिक भावना दुखावतात. त्यामुळे आपण ते खाऊ नये. हे आपले मौलिक कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.गुजरात विधानसभेत गोहत्या बंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली असून या गुन्ह्यात आता जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. या सुधारित कायद्याचेही त्यांनी समर्थन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करावे अशी मागणीच त्यांनी केली.

त्रिवार तलाकलाही विरोध
दिवान अबेदिन यांनी त्रिवार तलाकलाही विरोध दर्शवला आहे. कुराण आणि शरीयामध्ये त्रिवार तलाकला मान्यता नाही असा दावा त्यांनी केला. आपल्या बहिणी आणि मुलींसाठी अन्यायकारक असलेल्या पद्धती बंद केल्या पाहिजे असे भावनिक आवाहन त्यांनी केले. अजमेर शरीफ दर्गा हे मुस्लिमांसाठी देशातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे.

महिलांची नोकरी इस्लामविरोधी
देवबंदचे मौलाना आणि तंजीम उलेमा ए हिंदचेे प्रदेशाध्यक्ष नदीम उल वाजदी यांनी मुस्लिम महिलांनी कोणत्याही प्रकारची नोकरी करणे इस्लाम विरोधी असल्याचे विधान केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

देवबंदचे फतवे चर्चेत
आपला चेहरा झाकून महिंलांनी काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. देवबंद नेहमी फतव्यावरून चर्चेत असते. यापूर्वी दारूल उलूम देवबंदने फ घटस्फोटासाठी महिला उपस्थित राहणे आवश्यक नाही. पतीला मोबाइलवरूनही पत्नीशी घटस्फोट घेता येईल. मोबाइल फोनवरून दिलेला घटस्फोट मान्य केला होता. त्यावेळी देवबंदवर मोठी टीका करण्यात आली होती. दारूल उलूमने भारत माता की जय म्हणणे इस्लामासाठी योग्य नसल्याचे म्हटले होते.