अनु मलिकच्या डोक्यावर पुन्हा ‘मीटू’चे वादळ; गायिकेने केले छळाचे आरोप !

0

मुंबई: गेल्या दोन-तीन वर्षापासून बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रात मीटूच्या चळवळीने खळबळ माजवून दिली. या चळवळीत बॉलिवूडचे अनेक दिग्गज अडकले होते. या चळवळीअंतर्गत अनेक महिलांनी बॉलिवूडच्या अनेकांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यात आघाडीचा संगीतकार अनु मलिक याच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता. यानंतर अनु मलिकची एका रात्रीत ‘इंडियन आयडल 10’ या शोमधून हकालपट्टी झाली होती. वर्षभरानंतर मीटूचे वादळ शांत झाल्यानंतर अनु मलिक ‘इंडियन आयडल 11’मध्ये परतला. पण आता पुन्हा अनु मलिक यात अडकला आहे.

गायिका नेहा भसीन हिने अनु मलिकवर लैंगिक छळाचे आरोप केले आहे. अनु मलिक ‘इंडियन आयडल 11’मध्ये परतताच गायिका सोना मोहपात्रा हिने संताप व्यक्त केला. ‘महालांच्या सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी काय ‘निर्भया’ सारखीच घटना घडायला पाहिजे का? असे ट्विट तिने केले. तिच्या या ट्विटला उत्तर देताना आता गायिका नेहा भसीन हिने तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला आहे.

‘ मी 21 वर्षांची असताना एका गाण्याची सीडी देण्यासाठी अनु मलिकला भेटली होती. त्यावेळी मी इंडस्ट्रीत नवीन होते तर अनु प्रसिद्धीच्या शिखरावर होता. त्याला भेटायला गेले असता तो सोफ्यावर झोपलेला होता आणि माझ्या डोळ्यांविषयी चर्चा करत होता. त्याचे वागणे अत्यंत आक्षेपार्ह होते. मला ते मुळीच आवडले नाही. अखेर खोट कारण सांगून मी तिथून पळून गेले. माझी आई खाली वाट बघतेय असे सांगून मी अक्षरश: तिथून पळ काढला होता. त्यानंतरही त्याने मला मॅसेज व फोन केलेत. मी त्यावर प्रतिक्रिया देणे बंद केले,’ असे नेहा भसीनने म्हटले आहे. इतकेच नाही तर अनु मलिक एक विकृत मानसिकतेचा पुरूष आहे, असेही नेहाने म्हटले आहे.

Copy