शिवसेनेच्या पाठींब्याला ‘प्रहार’

0

मुंबई: नुकताच राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात शिवसेनेच्या जागा वाढल्या असून किंग मेकरच्या भूमिकेत आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावरुन दबावाचं राजकारण सुरू असताना शिवसेनेला प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रहारचे आमदार राजकुमार पटेलदेखील उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण ताकदीनं शिवसेनेच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही कडू यांनी दिली. त्यामुळे दबावाच्या राजकारणात शिवसेनेचं सामर्थ्य वाढलं आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी कडूंनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची कामं रोजगार हमी योजनेतून करणं, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी आणि अचलपूर, मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यांवर शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं कडूंनी सांगितलं.

सर्वसामान्य नागरिकांच्या, आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्यानं त्यांना शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं कडू म्हणाले. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं पत्रदेखील यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू अचलपूरचं, तर राजकुमार पटेल मेळघाटचं प्रतिनिधीत्व करतात.

Copy