वाघाडी रासायनिक कंपनी स्फोटप्रकरणी तीन संशयितांना अटक

0

चार दिवसांची पोलीस कोठडी

शिरपूर: तालुक्यातील रुमित केमिसिंथ प्रा.लि. कंपनीत झालेल्या भीषण स्फोट व त्यात कामगार मृत्यूमुखी झाल्याप्रकरणी तीन संशयितांना शुक्रवारी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. सविस्तर असे, तालुक्यातील वाघाडी येथील रुमित केमिसिंथ कंपनीत 31 ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त कामगार जखमी झाले होते.

शासनाने याप्रकरणी कमेटी गठित केली होती. त्या समितीत सदस्य सचिव म्हणून डी.बी.गोरे (सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, नाशिक विभाग, नाशिक) यांची तर सदस्य म्हणून प्रवीण रघुनाथ घोलप (अग्निशमन अधिकारी, एमआयडीसी सिन्नर, जि.नाशिक), एस.एम.कुरमुडे (प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रक मंडळ जळगाव), केसरसिंग जयसिंग पाटील (माजी विभागप्रमुख, रसायन शास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), विलास निवृत्ती पवार (प्लांट मॅनेजर, स्पेक्ट्रम इथर्स लि.रासेगाव, ता.दिंडोरी, जि. नाशिक) व श्रीमती कावेरी एम. कमलाकर (सहाय्यक आयुक्त, राज्य गुन्हे शाखा, नाशिक) यांची नियुक्ती केली आहे. समितीने रुमित केमिसिंथ प्रा.लि. कंपनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. तपासाधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
शुक्रवारी, 27 सप्टेंबर रोजी कंपनीचे संचालक संजय बाबुराव वाघ (वय 62, रा.मातृदर्शन, वसंत मार्केट समोर, गंगापूर रोड, नाशिक), डेप्युटी मॅनेजर नायट्रेशन ब्लॉक गणेश भानुदास वाघ (36, रा.गायत्री नगर, ढेकू रोड, अमळनेर), जनरल मॅनेजर प्रोडक्शन अनिल केशव महाजन (वय 52, रा.मु.पो.गुलई, ता.खकणार, जि.बर्‍हाणपूर(मध्यप्रदेश) ह.मु. 69/49 भगवंत पार्क, वरझाडी रोड, शिरपूर) यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली संशयित म्हणून अटक केली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.