ढोंगी कंपूचे टूलकिट आणि मोदींची सात वर्ष!

शिवराय कुळकर्णी

आजपर्यंत देशहितापेक्षा सत्तास्वार्थाला अधिक महत्व देणार्‍यांचा बुरखा टराटरा फाडून मुळात माओवादी पण वरवर डावे, कथित पुरोगामी, ढोंगी धर्मनिरपेक्ष आणि पंचतारांकित संस्कृतीत वावरत लोककल्याणाचा पुळका दाखवणारे बेगडी बुद्धीजीवी यांचे खरे रूप देशासमोर आणण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात वर्षांच्या कारकिर्दीला आहे. 30 मे रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भक्कम व कार्यक्षम केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. जवळ जवळ दोन दशकांनंतर भारतात स्पष्ट व निर्णायक बहुमत असलेले सरकार असल्याने देशहिताच्या निर्णयांना प्राधान्य देणारे हे सरकार असल्याचे भारताने अनुभवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ प्रतिमा, अफाट निर्णय क्षमता, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात वाजत असलेला त्यांच्या कीर्तीचा डंका, त्यांच्या पाठीशी असलेली मजबूत पक्ष संघटना आणि भारतभर असलेली त्यांची लोकप्रियता ही विरोधकांची मोठी अडचण बनली आहे. परिणामी आपला टिकाव लागावा किंवा आपले अस्तित्व कायम राहावे म्हणून मोदी विरोधकांजवळ केवळ एक कार्यक्रम आहे आणि तो म्हणजे मोदींचे प्रतिमाभंजन !

मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे देशातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या व प्रामुख्याने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. घराणेशाहीमुळे आणि वारसाहक्काने पंतप्रधानपद आणि देशाची सत्ता आमचीच या समीकरणाला देशातील जनतेने मूठमाती दिली. विविध राज्यात एकमेकांची खुर्ची हिसकणारे, एकमेकांवर चढणारे छोटे-मोठे पक्ष आपापल्या विचारधारा गुंढाळून फक्त आणि फक्त मोदी विरोधासाठी एकत्र येत असल्याचा अनुभव आहे. मोदी जे बोलतील, जे करतील त्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करणे हा यांचा एकमेव अजेंडा. ‘डुबते को तिनके’ का सहारा हा वाक्प्रचारच यांनी बदलवून टाकला. ‘डुबते को टूलकिट’ का सहारा, ही यांची वर्तमानातील स्थिती. सातही वर्ष मोदींविरोधात अपप्रचारावर जनमत बदलवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यातील गेले वर्ष तर असे आहे की, देशच नव्हे संपूर्ण विश्व कोरोनाच्या थैमानाने ग्रस्त आहे. जग कोरोना विरोधात लढते आहे. जगातील अनेक विकसित देशांच्या तुलनेत साधन सामुग्रीच्या मर्यादा असतानाही भारत मोदींच्या नेतृत्वात कोरोना विरोधात प्रभावी लढा देत असताना मोदी विरोधी कंपू मोदी विरोधात लढण्यात मश्गुल आहे. देशाचे नुकसान झाले तरी चालेल, जनतेचे हाल झाले तरी चालतील, जगात भारताची प्रतिमा खराब झाली तरी चालेल पण आमची गेलेली सत्ता कुठल्याही मार्गाने परत मिळवता यावी म्हणून मोदींच्या विरोधात भूमिका घेण्याची चढाओढ या डावे, काँग्रेसी, कथित पुरोगामी आणि बुद्धीजीवी यांच्यात लागली आहे. अपप्रचाराची टूलकिट हाच यांचा वचननामा. एकदम पुरस्कार वापसी गँग समोर येते. एकाएकी विशिष्ट लोकांना भारतात असुरक्षित वाटायला लागते. गावोगावी शाहीनबाग उभे केले जाते. गाईला माता मानणारा शेतकरी रस्त्यावर दूध ओतू शकतो का ? पण रस्त्यांवर दूधाच्या नद्या वाहतील, एवढे दूधाचे टँकर पुरवले जातात. घामाने, कष्टाने हाती आलेले पीक रस्त्यावर फेकताना निवडक चेहरे समोर येतात. ज्यांच्या पिकाला भाव नाही आणि उपाशी मरण्याची भीती असते, अशा शेतकर्‍यांचे आंदोलन पंचतारांकित कसे असू शकते ? या देशाने शरद जोशी आणि महेंद्रसिंग टिकैत यांची आंदोलने बघितली आहेत. संपूर्ण देश आ वासून अशी आंदोलने पाहून थक्क होतो. एका रात्रीतून माओवादींना साहित्यिक ठरवले जाते. भगतसिंह, राजगुरू, चंद्रशेखर आझादांसोबत माओवाद्यांच्या तस्वीरी आंदोलनात झळकतात. माओवादी म्हणून तुरुंगात असलेल्या आरोपींचा शेतकरी कायद्यांशी काय संबंध ? भारत तेरे तुकडे होगे, म्हणणारी टुकडे टुकडे गँग देशभर फिरवली जाते. राहुल, सोनिया, केजरीवाल, अखिलेश यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे असे विविध पक्षातील लोक एका सुरात बोलायला लागतात. सोयीस्कररित्या ईव्हीएम दोषी असते. प्रसार माध्यमांमध्ये बसलेले यांचे चेले चपाटे देखील टूलकिट नुसार वागतात. मोदींना तर भारत विरोधी देशांच्या तुलकीटचा आणि भारता अंतर्गत या कंपूच्या टूलकिट चा सामना करावा लागतो. बहुतांश वेळा भारत विरोधी देशांची टूलकिट आणि या कंपूची टूलकिट समसमान असते. ते भारताला खिळखिळे करण्याचे षड्यंत्र आखतात आणि यांना भारत खिळखिळा झाला तरी चालेल पण मोदींचा पराभव झाला पाहिजे याच असुरी भावनेने ग्रासलेले असते. माझ्या मते नरेंद्र मोदी यांचे हेच बलस्थान आहे. भारतीय जनतेमध्ये नरेंद्र मोदींच्या सतत वाढत असलेल्या लोकप्रियतेचे देखील हेच एक प्रमुख कारण आहे. देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी मोदी लढतात आणि त्यांना बदनाम करण्यासाठी वापरात येणारे टूलकिट उघडे पडले की, त्या कंपूच्या गमावलेल्या विश्वासार्हतेत पुन्हा भर पडते. एखाद्यावेळी दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या गरजांची पूर्ती करण्यात सरकारला पूर्ण यश आले नाही तरी जनतेचा विश्वास डळमळीत होत नाही. लोकांना खात्री असते की मोदीजी आहेत, तर यावर देखील मार्ग निघेलच. लोकांची वेळ देण्याची तयारी असते. मोदींनी आपल्या व्यवहारातून हे जनमत तयार केले आहे. विरोधकांच्या टीकेचा विषय असलेला मोदींचा कणखरपणा लोकांना अधिक भावतो. राजकारणात लोटांगण घेणार्‍या नेतृत्वाऐवजी भारताला ताठ मानेने जगणं शिकवणारा नेता हीच मोदींची मोठी ओळख ठरते.

मोदी विरोधाचे टूलकिट विरोधकांच्या कसे अंगलट येते, याची काही उदाहरणे देता येतील. सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रियांमध्ये आढळलेली ही उदाहरणे आहेत. वास्तविक पाहता मोदींच्याच कार्यकाळात देशात सर्वाधिक एम्स रुग्णालये उभारण्यात आली. पण कोरोना काळात काँग्रेसने अपप्रचार केला. रामजन्मभूमी मंदिर हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा विषय असताना काँग्रेसने रान उठवले. मंदिराऐवजी दवाखाने का नाही बांधले, असा प्रश्न काँग्रेसी विचारत होते. काँग्रेसच्या काळात केवळ तीन आणि उर्वरित एम्स मोदींच्याच काळात झालेले असतानाही हा प्रश्न विचारून टीका केली. यावर भाजपा बोलण्याआधी लोकच बोलू लागले. देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ गेली साठ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने शौचालये देखील न बांधल्याने मोदीजींनी प्रथम शौचालये बांधली. सोबत दवाखानेही बांधले. लोकांना संडासही बांधून न देऊ शकणारी काँग्रेस कोणत्या तोंडाने बोलते, असा प्रतिप्रश्न जनसामान्य विचारू लागतात. स्वतःच्या वर्तनाने जनतेत प्रतिमा गमावलेल्यांच्या कामी परिश्रमांऐवजी कितीही टूलकिट आणल्या आणि वापरल्या तरी फरक पडत नाही, असे वारंवार सिद्ध होते आहे.

भारतातील मोदी विरोधकांचे आणि जगातील भारत विरोधकांचे हातात हात घालून कारस्थान चालत असल्याचा उत्तम नमुना म्हणजे जगातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आपले बायबल मानत असलेल्या The Lancet या जागतिक वैद्यकीय संशोधन नियतकालिकेने भारतातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. या नियतकालिकात आलेली टीका आणि राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विट्सचा आशय एकसारखा आहे. आता राहुल गांधी त्यांची भाषा बोलतात की, ते राहुल गांधींची एवढाच संशोधनाचा विषय आहे. डोकलामवर चिनी सैन्य उतरले असताना जे रात्रीच्या अंधारात चिनी अधिकार्‍यांशी गुप्त मंत्रणा करतात त्यांना सत्तास्वार्थासमोर देशहित वैगेरे मुद्दे किस गली मे खसखस !

The Lancet या नियतकालिकेने भारतात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरण्यासाठी काँग्रेसच्याच टूलकीटप्रमाणे कुंभमेळा, निवडणुका जबाबदार मानल्या आहेत. निवडणुका पश्चिम बंगाल मध्ये होत्या आणि कुंभमेळा उत्तराखंडमध्ये. तेव्हा सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान यांचा समावेश होता. तसेही या राज्यांनी कोरोनातील आपले अव्वल स्थान सतत कायम ठेवले आहे. मात्र, जबाबदार काय तर कुंभमेळा ! एकेकाळी चाचांनी हिंदी चिनी भाई भाई म्हणत ठरवलेली दिशा सोडण्यास काँग्रेस तयार नाही. संपूर्ण जग कोरोना व्हायरसला चीनचा व्हायरस म्हणत असताना काँग्रेस मात्र, भारतीय व्हायरस म्हणत सुटली आहे. लसीकरणा संदर्भात The Lancet ने दिलेली आकडेवारी सपशेल खोटी आहे. कारण, ही आकडेवारी मिळवण्यासाठी त्यांनी राहुल गांधी यांच्या बेजबाबदार ट्विट्सचा आधार घेतला. The Lancet यांची विश्वासार्हता कमी करणारे प्रकार या काळात अनेकदा घडले. तेही प्रामुख्याने भारताच्या बाबतीत आणि नंतर त्यांना ते निष्कर्ष मागे घ्यावे लागले व आपल्या पोर्टलवरून काढून घ्यावे लागले. तात्पर्य हे की, लोकशाहीत विरोधी पक्षाने बजावण्यासाठी आवश्यक असलेली प्रखर भूमिका सोडून आम्ही सत्तेत नाही तर देशाचे वाटोळे झाले पाहिजे, ही असूरी भावना प्रबळ झाली आहे. या सर्व काळात मोदी अविचल आहेत. निश्चल आहेत. विरोधकांच्या टूलकिटला भारतीय जनताच उत्तर देते. म्हणूनच मोदींच्या नेतृत्वात भाजपाची व देशाची आगेकूच सुरू आहे. भारताच्या जनतेचा कोरोना काळात मोदी है तो मुमकीन है यावरचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे.

(लेखक भाजपा महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत) 

संपर्क – 9881717827

Copy