आता एसबीआयच्या एटीएममधून दिवसाला काढता येणार फक्त २० हजार

0

मुंबई – स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएममधून काढण्यात येणाऱ्या रोख रकमेच्या दैनंदिन मर्यादेमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या 31 ऑक्टोबरपासून एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून दररोज केवळ 20 हजार रुपयेच काढता येणार आहेत. सध्या एसबीआयच्या ग्राहकांना आपल्या एटीएममधून दररोज 40 हजार रुपये काढता येतात. मात्र नवा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दररोज 20 हजार रुपयेच एटीएममधून काढता येतील.

या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आपल्या शाखांना सूचना देण्यात आली आहे. एटीएम ट्रांन्झॅक्शनमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या वाढत्या तक्रारी आणि डिजिटल-कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण वाढवण्यासाठी एटीएममधून रोख रक्कम काढण्याची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्लासिक आणि मेस्ट्रो प्लॅटफॉर्मवरून जारी करण्यात आलेल्या डेबिड कार्डमधून रक्कम काढण्याची मर्यादा घटवण्यात आली आहे.

हा निर्णय दिवाळीपूर्वीच लागू होणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सरकारकडून डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र असे असले तरी रोख रकमेच्या मागणीत घट झालेली नाही. त्यामुळे बाजारातील रोख रकमेचा पुरवठा हा नोटाबंदीपूर्वीच्या स्तरावर पोहोचला आहे.

Copy