सगळ्यांनाच चकवले; वर्षा राऊत ईडीसमोर हजर

0

मुंबई – शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी सगळ्यांनाच चकवत सोमवारी (दि.4), ईडीसमोर हजेरी लावली. त्या पूर्वनियोजनानुसार 5 जानेवारी रोजी, चौकशीसाठी हजर होणार असल्याचे सांगण्यात येत होते.

ईडीने पीएमसी (PMC) बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यावर त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. त्यानुसार त्यांना 5 जानेवारी ही तारीख मिळाली आहे, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात वर्षा राऊत या सोमवारी, 4 जानेवारीलाच ईडीसमोर हजर झाल्या. वर्षा राऊत यांचे पती व शिवसेनेचे प्रवक्ता खा. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली आहे. त्यांची संपत्तीही ईडी (Enforcement Directorate) ने  जप्त केली आहे. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले असून, त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली होती.

वाद, आंदोलन टाळण्यासाठी खेळी ?
दरम्यान, वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर प्रचंड आगपाखड केली होती. त्यामुळे भाजपा विरूद्ध शिवसेना असा हा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली होती. शिवसैनिक ईडीविरोधात आंदोलनाच्या तयारीत असल्याचे चर्चा होती. मात्र, हे सर्व टाळण्यासाठीच वर्षा राऊत सर्वांना चकवत अचानकपणे सोमवारीच ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत, असा दावा केला जात आहे.