Private Advt

रस्त्यांमुळे दळणवळणासह शेतकर्‍यांना फायदा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

रस्ते कामांचा उत्तम दर्जा राखण्यासाठी ठेकेदारांना दिल्या कानपिचक्या

जळगाव, (प्रतिनिधी) : रस्ते हे रक्त वाहिन्यांप्रमाणेच अतिशय महत्वाचे असतात. याचा दळणवळणाला तर लाभ होतोच पण शेतकर्यांनाही याचा फायदा होत असतो. जिल्ह्याच्या विकासासाठी रस्त्यांचा विकास परिणामकारक असल्यामुळे मतदारसंघातील रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाला आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. रस्ते कामांचा उत्तम दर्जा राखण्यासाठी अधिकारी व ठेकेदार यांच्यात समन्वय महत्वाचा असून कुणी कामात कुचराई केल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पालकमंत्र्यांनी दिला. जळगाव तालुक्यातील आसोदा, ममुराबाद, विदगाव आणि नांद्रा या गावांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपुजन केल्यानंतर आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते परिसरातील तब्बल साडे दहा कोटी रूपयांच्या कामांचा शुभारंभ आज करण्यात आला असून यामुळे परिसरात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. तर याच कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी सज्ज राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करून कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी नमूद केले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपुजन आज करण्यात आले. यानिमित्त आसोदा, ममुराबाद, रिधूर, नांद्रा, विदगाव येथे पालकमंत्र्यांच्या अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजीत त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : ना. गुलाबराव पाटील
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी ठेकेदार आणि अधिकार्‍यांमध्ये समन्वय असावे असे सूचित केले. ठेकेदारांनी रस्त्यांची कामे चांगली करावीत. आपले यावर लक्ष असून कुणी कामात कुचराई केल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला. तर लवकरच विविध कार्यकारी सहकारी संस्था, बाजार समित्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका येत असून यात हातात झेंडा घेणार्‍या कार्यकर्त्यांसाठी या निवडणुका खूप महत्वाच्या आहेत. आपण केलेल्या कामांच्या बळावर सर्वच ठिकाणी शिवसेनेला यश मिळणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. तसेच आपण निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

या कामांचे झाले भूमिपुजन
आजच्या कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुढील कामांचे भूमिपुजन झाले. राज्य मार्ग क्रमांक 6 वरील आसोदा ते देऊळवाडा दरम्यानच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि आसोदा येथील बल्ल्डाची वाट व इंदिरानगर ते कन्याशाळेच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण ( 2 कोटी) ; आसोदा ते देऊळवाडा दरम्यानच्या रस्त्याची विशेष दुरूस्ती ( 1 कोटी 26 लाख रूपये) ; आसोदा ते ममुराबादच्या दरम्यानच्या रस्त्याची सुधारणा ( 3 कोटी 40 लाख ) ; जळगाव ते विदगाव रस्त्याचे डांबरीकरण (2 कोटी 37 लाख) ; नांद्रा ते भोलाणे दरम्यानच्या रस्त्याचे काम (86 लक्ष रूपय) आणि अवचित हनुमान फाटा ते मंदिरापर्यंतचे काँक्रिटीकरण आणि मंदिर परिसरात सभामंडपाच्या 42 लाख रूपयांच्या कामाचे भूमिपुजन देखील आज करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, सार्वजनीक बांधकाम खात्याचे सहायक अभियंता श्रेणी-1 सुभाष राऊत, शाखा अभियंता ए.व्ही. सूर्यवंशी, जे.के. महाजन, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सभापती ललीताताई पाटील, युवा सेना जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, जनाआप्पा कोळी, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष रमेशआप्पा पाटील, पंकज पाटील, मुकेश सोनवणे, तुषार महाजन, अनिल भोळे, किशोर चौधरी, विदगाव सरपंच प्रतिभाताई सपकाळे, डॉ. कमलाकर पाटील, पोलीस निरिक्षक कुंभार, शिवाजी कोळी, जितू पाटील, राजू बेडीस्कर, ठेकेदार सुधाकर कोळी, नानाभाऊ सोनवणे, भरत बोरसे यांच्यासह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिक आणि युवा सैनिकांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चुव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन सुधाकर कोळी यांनी मानले.