अंकशास्त्राच्या नादात नंबर चोरला, तोही रतन टाटांच्या कारचा!

0

मुंबई – ऐकावे ते नवलच ! मुंबईतील एका महिलेने भलताच प्रताप करून ठेवला. अंकशास्त्राच्या नादापायी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (ratan tata) यांच्या कारचाच नंबर चोरला. जेव्हा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी या महिलेला दंड केला तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 465 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई (mumbai) पोलिसांनी एका बीएमडब्ल्यू कारला दंड केला आणि त्याची नोटीस पाठवली. या कारवरील क्रमांक हा रतन टाटा यांच्या वाहनाचा असल्याने ही नोटस टाटा यांच्या घरी गेली. पण तोपर्यंत पोलिसांना पुढे काय घडेल याची जराही कल्पना नव्हती. नोटीस मिळाल्यानंतर टाटा यांच्यावतीने खुलासा केला गेला आणि मग काही तरी गडबड झाली असल्याचे पोलिसांच्याही लक्षात आले. त्यांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी ज्या ठिकाणाहून दंडाची नोटीस जारी केली होती त्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज शोधले. तपासणीत पोलिसांना एका महिलेची कार सापडली. शोध घेत पोलीस त्या महिलेकडे पोहोचले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत समोर आले की, ही कार एका कंपनीच्या नावावर नोंदणी झालेली होती आणि त्या कंपनीची मालक ही महिला आहे. मुंबईतील माटुंगा पोलिसांनी लक्झरी बीएमडब्ल्यू कारसह मालकास अटक केली. महिलेच्या विरोधात भादंवि कलम 420 आणि 465 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासात पोलिसांना असेही समजले की, वाहतुकीचे नियम मोडणारी कार एका कंपनीच्या नावे नोंदवली गेली आहे. ही कार जी महिला चालवत होती तिने अंकशास्त्राच्या नादात कारच्या अधिकृत क्रमांकात फेरफार केला होता. पण हा क्रमांक रतन टाटा यांच्या कारचा आहे हे तिलाही माहित नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका ज्योतिषाने खास नंबर प्लेट असलेली कार वापरण्याचा सल्ला या महिलेला दिला होता आणि तिने त्यानुसार आपल्या कारकच्या क्रमांकात परस्पर बदल केला होता.