चोपडा मतदारसंघात शिवसेनेसमोर पेच

0

राष्ट्रवादीकडून माजी आ. वळवींची मोर्चेबांधणी : भाजपाचेही ‘हम भी है जोश में

जळगाव – चोपडा मतदारसंघ हा लोकसभेत भाजपाच्या आणि विधानसभेसाठी इतर पक्षांच्या पाठीशी उभा राहणार मतदारसंघ आहे. आदिवासी, कोळी, मराठा, गुर्जर असे सामाजिक प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात प्रा. चंद्रकांत सोनवणे हे शिवसेनेचे आमदार आहेत. सध्या मात्र घरकुल घोटाळ्यामुळे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे कारागृहात असल्याने याठिकाणी शिवसेनेला उमेदवार शोधण्यासाठी मोठा पेच निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी याचा फायदा घेत मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचे नेतृत्व कुणाकडे जाते याकडे लक्ष लागले आहे.

चोपडा विधानसभा मतदारसंघात माजी शिक्षणमंत्री शरच्चंद्रीका आक्का पाटील यांचे काही काळ वर्चस्व होते. त्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा खा. शरद पवारांचे कट्टर समर्थक अरूणभाई गुजराथी यांचे तब्बल 20 वर्ष एकहाती वर्चस्व राहीले होते. त्यानंतरच्या काळात माजी आमदार कैलास पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातुन हा मतदारसंघ ताब्यात घेतला होता. त्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला. सन 2009 मध्ये जगदीश वळवी हे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या माधुरी किशोर पाटील यांचा 11 हजार 935 इतक्या मताधिक्याने पराभव केला होता. तर तिसर्‍या स्थानी भाजपात प्रवेश केलेल्या आणि आता सध्या राष्ट्रवादीत असलेल्या जगदीश वळी यांना 30 हजार 559 मते मिळाली होती. या मतदारसंघात 3 लाख 7 हजार 760 मतदार आहेत. यात 1 लाख 58 हजार 236 पुरूष, 1 लाख 49 हजार 523 स्त्री तर इतर एक असे मतदार आहेत.

सामाजिक गणित ठरते निर्णायक

या मतदारसंघात कोळी, मराठा, गुर्जर आणि आदीवासी समाजाचे मोठे मतदान आहे. सामाजिक गणितांवरच याठिकाणच्या मतदारसंघाचे भवितव्य ठरत असते. शिवाय मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये भाजपानेही शिरकाव केला आहे. सामाजिक गणित लक्षात घेऊनच लोकसभा निवडणुकीत खासदार रक्षा खडसे यांना या मतदारसंघाने मोठे मताधिक्य दिले आहे.

मतदारसंघात विद्यमान आमदारांकडुन विकासाचे प्रयत्न

या मतदारसंघात विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी जलयुक्त शिवार, रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण, पाणीपुरवठा योजना, अतिदुर्गम भागातील अंगणवाडी बांधकाम, व्यायाम शाळा यासारखी कामे करून विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भरीव आणि ठोस असे काम नसल्याची चर्चाही मतदारसंघात आहे.

शिवसेनेकडुन आमदारांच्या पत्नी, भाऊ इच्छुक

आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे कारागृहात असल्याने त्यांना निवडणूक लढण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेकडुन त्यांच्या पत्नी लताताई सोनवणे व भाऊ शामकांत सोनवणे हे इच्छुक उमेदवार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेत दोन गट पडले असुन शिवसेनेचे माजी आ. कैलास पाटील यांनी देखिल उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

राष्ट्रवादीकडुन मोर्चेबांधणी

घरकुल घोटाळ्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे कारागृहात आहे. नेमका याचाच फायदा घेत राष्ट्रवादीकडुन माजी आ. जगदीश वळवी यांनी पुन्हा मोर्चेबांधणी केली आहे. पक्षाकडुन उमेदवारीसाठी त्यांचे पारडे जड मानले जात आहे. तसेच माधुरी किशोर पाटील, डी.पी. साळुंखे हे देखिल इच्छुक आहेत.

भाजपाकडूनही तयारी

गत 2014 च्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना आमने-सामने लढले होते. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाचा मतदारही आता तयार झाला आहे. जवळपास 30000 मतदान भाजपाचे असल्याची माहिती आहे. यंदाही भाजपाने या मतदारसंघातुन निवडणुकीसाठी तयारी केली आहे. त्यासाठी भाजपकडून मगन बाविस्कर, जि.प.चे सभापती प्रभाकर सोनवणे, गोविंद सैंदाणे, प्रज्ञा जितेंद्र सपकाळे, जगन्नाथ बाविस्कर हे इच्छुक आहेत. तसेच डॉ.चंद्रकांत बारेला यांनीही भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे युती न झाल्यास किंवा जागा बदल झाल्यास या मतदारसंघातुन भाजपाही निवडणुकीच्या रिंगणात राहू शकते.

2014 च्या निवडणुकीत मिळालेली मते

प्रा. चंद्रकांत सोनवणे (शिवसेना) 54176 (28.86टक्के)
माधुरी किशोर पाटील (राष्ट्रवादी) 42241 (22.50टक्के)
जगदीशचंद्र वळवी (भाजपा ) 30559 (16.28 टक्के)