प्रचारतोफा आज थंडावणार

0

खान्देशात 20 मतदारसंघांसाठी 164 उमेदवारांमध्ये लढत

जळगावात 100, धुळ्यात 38 तर नंदुरबारमध्ये 26 उमेदवार रिंगणात


जळगाव : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या राजकीय पक्षांच्या प्रचारतोफा आज सायंकाळी 6 वा. थंडावणार आहेत. खान्देशात 20 जागांसाठी 164 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहे. दि. 21 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे.
विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार सभांनी खान्देशातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे खा. शरद पवार यांच्या सभांनी या निवडणुकीत रंगत आणली आहे. निवडणुकीचा जाहीर प्रचार उद्या दि. 19 रोजी सायंकाळी 6 वा. थांबणार आहे. त्यानंतर छुप्या प्रचाराला मात्र सुरू राहणार आहे.

जळगाव जिल्ह्यात 11 जागांसाठी 100 उमेदवार

जळगाव जिल्ह्यात 11 जागांसाठी 100 उमेदवार मैदानात आहेत. जिल्ह्यात एकूण 34 लाख 47 हजार 148 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार 17 लाख 96 हजार 326 तर स्त्री मतदार 16 लाख 50 हजार 729 व इतर 93 अशा मतदारांचा समावेश आहे. तसेच 11 विधानसभा मतदार संघात एकूण 7846 सैनिक मतदार आहेत. तर दिव्यांग मतदार एकूण 14852 आहेत. चोपडा मतदारसंघ -8, रावेर-10, भुसावळ-12, जळगाव शहर-13, जळगाव ग्रामीण-11, अमळनेर-7, एरंडोल-8, चाळीसगाव-8, पाचोरा-7, जामनेर-9, मुक्ताईनगर-7 अशी उमेदवारांची संख्या आहे.

धुळे जिल्ह्यात 5 जागांसाठी 38 उमेदवार

धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघांसाठी एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 16 लाख 79 हजार 942 मतदार आहेत. त्यात पुरूष 8 लाख 66 हजार 849, स्त्री 8 लाख 13 हजार 66 आणि इतर 27 मतदारांचा समावेश आहे. साक्री- 9, धुळे ग्रामीण- 5, धुळे शहर- 10, शिंदखेडा- 7, शिरपूर- 7 या प्रमाणे उमेदवार आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात 4 जागांसाठी 26 उमेदवार

नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 12 लाख 24 हजार 429 मतदार आहेत. त्यात अक्कलकुवा मतदारसंघात – 6, नवापुर- 10, नंदुरबार- 6, शहादा- 4 असे 26 उमेदवार आहेत.