पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ‘ट्वीस्ट’; कुटुंबियांना मिळालेत पाच कोटी

पुणे: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने राज्याचे वनमंत्री शिवसेना नेते संजय राठोड यांनी काल आपला राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत होती. राजीनामा घेतल्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू न देण्यावर विरोधक ठाम होते. शेवटी राजीनामा दिल्यानंतर आता हे प्रकरण शांत होईल असे बोलले जात होते. मात्र पूजा चव्हाणच्या चुलत आजीने एक खळबळजनक दावा केला असून पुन्हा या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. पूजा चव्हाण प्रकरण दडपण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले असा खळबळजनक दावा पूजाच्या एका आजीने केला आहे. शांताबाई चव्हाण असे पूजाच्या चुलत आजीचे नाव असून तिने आई-वडिलांवरही आरोप केले आहे.

काल मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. केवळ विरोधकांकडून राजकारण केले जात असून आमच्या मुलीची आणि कुटुंबियांची बदनामी केली जात आहे. प्रकरणात संपूर्ण तपास व्हावा व तिला न्याय मिळावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. केवळ संशयावरून कोणाचे नुकसान होऊ नये, असेही पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे भावना व्यक्त केली.

या भेटीनंतर शांताबाई राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांवर पैसे घेऊन प्रकरण मिटवत असल्याचा आरोप केला आहे. ‘पूजाच्या आई-वडिलांना लेकराची किंमत नाही. मी चुलत आजी आहे. त्यामुळं माझं कोणी ऐकणार नाही. पण त्यांनी समाजाची दिशाभूल केली आहे. आता मुख्यमंत्र्यांचीही दिशाभूल करत आहेत. पूजाचे आई-वडील खोटं बोलत आहेत. संजयभाऊ राठोड यांनी ५ कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड बंद केलं आहे. आमची मुलगी चांगली होती असं ते कधीच म्हणणार नाहीत,’ असंही शांताबाई म्हणाल्या.

Copy