“भोळे महाविद्यालयात ऑनलाईन मराठी भाषा गौरव दिवस व कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवस उत्साहात संपन्न “

भुसावळ |प्रतिनिधी 

येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात शुक्रवारी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ आर. पी. फालक, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. मंदा गावित, प्रथम सत्र वक्ते प्रा. डॉ. जय बागुल, कला वाणिज्य महाविद्यालय अक्कलकुवा जि. नंदुरबार, व्दितीय सत्रात उपप्राचार्य प्रा. डॉ. फुला बागुल एसपीडीएम महाविद्यालय शिरपुर जि. धुळे हे उपस्थित होते.
पहिल्या सत्रात ” मराठी भाषेचे संवर्धन आणि नागरीकांचे कर्तव्य ” या विषयावर बोलतांना प्रा. डॉ. जय बागुल यांनी सांगितले की, मराठी भाषा गौरव दिवस साजरा करणे हे प्रत्येक मराठी माणसाचं आद्य कर्तव्य आहे. आज जगात भाषेच्या संदर्भात बरेच बदल घडून येत आहेत. प्रचंड प्रमाणात गुगल, एफएम, मोबाईल आणि माणसांची जीवनशैली यामुळे राहणीमान बोलीभाषा यावर प्रचंड परिणाम होत आहेत. शिक्षणातील अभ्यासक्रमात झालेला बदल इंग्रजी संस्कृतीचा समाजावर झालेला परिणाम, माणसांच्या आवडीनिवडी यावर दिलेली वेगवेगळ्या उदाहरणामुळे मराठी भाषेवर कसा परिणाम झाला, हा सारा व्रुतांत आपल्या ओघवत्या शैलीत खुमासदार पध्दतीने मांडले. तर द्वितीय सत्रात उपप्राचार्य प्रा. डॉ. फुला बागुल शिरपूर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत आपले मत मांडतांना पारंपारिक शिक्षण पध्दती आणि नव्याने प्रारंभ होणारे नवे शैक्षणिक धोरण, यामुळे प्रादेशिक भाषांना चांगले दिवस येतील असा आशावाद व्यक्त केला. याचबरोबर गोवा राज्यातील गोमंतक आणि मराठी यांच्या तुलनेत ५० टक्के दोघांच्या तुलनेत भाषा बोलली जाते तरीही गोव्यामध्ये गोमंतक स्विकारल्या गेली याचे हेच कारण की, मराठी भाषिकांची उदासिनता ही आपल्या भाषेला कारणीभूत ठरते. यावर उपाययोजनांची ही मुद्देसुद माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. पी. फालक म्हणाले की, मराठी भाषेला दोन वेळा गौरविण्यात येते एक तर मे म्हणजे जागतिक मराठी भाषा दिवस व २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस अर्थात कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवस मराठी भाषा ही राजभाषा आहे. संविधानीक दृष्टिने महत्व असल्याने आज व्यवहारीक पातळीवर सुध्दा मोठ्या प्रमाणात वापर होत आहेत, शासकीय स्तरावर सुध्दा आता कामकाजाची अंमलबजावणी होतांना दिसत आहे. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या कुटुंबात , समाजात आणि व्यवहारात निरंतर वापर केला पाहिजे वापराची कास धरली पाहिजे तरच मराठी भाषेला गौरवास्पद न्याय मिळेल , मराठीचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय बाविस्कर तर आभार प्रा. डॉ. जयश्री सरोदे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय बाविस्कर, प्रा. डॉ. जयश्री सरोदे, प्रा. संगीता धर्माधिकारी, प्रा. डॉ. माधुरी पाटील, प्रा. श्रेया चौधरी प्रा. डॉ. जगदीश चव्हाण, प्रा. डॉ. जी. पी. वाघुळदे, प्रा.डॉ. आर.बी. ढाके, प्रा. डॉ. एस. डी. चौधरी, प्रा. एस. डी. चौधरी, प्रा. एस. जी. नेमाडे, प्रा. निर्मला वानखेडे, प्रकाश सावळे तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.