सर्वसामान्यांना ‘जोरका झटका’: गॅस सिलेंडरसह पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ

0

नवी दिल्ली: देशातील पेट्रोल-डीझेलचे वाढते दर लक्षात घेता केंद्र सरकारवर खूप टीका होत आहे. सर्वसामान्य नागरिक रोष देखील व्यक्त करत आहेत. त्यातच आता केंद्रीय अर्थसंकल्पानंतर पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. आज गुरुवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ३५ पैसै प्रति लीटर वाढ केली आहे. सोबतच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरातही २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दरवाढीचा ‘जोरका झटका’ बसला आहे. दिल्लीत पेट्रोल ८६.६५ रुपये लीटर आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कृषी सेस लावण्याचा निर्णय घेतला, मात्र यामुळे सामान्यांच्या खिशावर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा केद्र सरकारने केला होता. मात्र चित्र उलटे आहे, सर्वसामान्य महागाईने त्रासले आहे.

ग्राहकांना १४ किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी जास्तीच दर मोजावे लागणार आहेत, एलपीजी सिलेंडर २५ रुपयांनी महागला असून दिल्लीत ७१९ रुपये, कोलकाता ७४५.५०, मुंबई ७१० तर चेन्नईमध्ये ७३५ रुपये प्रति सिलेंडर हा यापुढे दर असणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहे, त्यामुळे भारतीय बाजारपेठेत जे कच्चे तेल येते त्यावर आंतरराष्ट्रीय दराचा परिणाम २०-२५ दिवसांनी दिसून येतो.

दिल्लीत गुरुवारी पेट्रोलचे दर ८६ रुपये ६५ पैसे प्रती लीटर आहेत, तर डिझेल ७६ रुपये ८३ पैसे प्रती लीटर आहे, याचप्रमाणे मुंबईत पेट्रोल ९३. २० रुपये, डिझेल ८३.६७, चेन्नई ८९.१३ रुपये तर डिझेल ८२.०४ रुपये प्रती लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर ८८.०१ रुपये तर डिझेल ८०.४१ रुपये आहे, नोएडा येथे पेट्रोल ८५.९१ रुपये तर डिझेल ७७.२४ रुपये प्रती लीटर आहे. मुख्यत: नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे महागाई वाढल्याची चिन्हे दिसतात.

Copy