अखेर तुकाराम मुंढे यांना बदलीची ऑर्डर मिळाली !

0

नाशिक – तुकाराम मुंढे यांची काल बदली झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे पत्र प्राप्त झाले नव्हते त्यामुळे ते आजही नाशिक महापालिकेत जाऊन आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर काही मिनिटांतच मुंढेंना बदलीचे पत्र मिळाले आहे. माझ्याकडे अद्याप बदलीसंदर्भातील कुठलिही ऑर्डर आली नाही, त्यामुळे मी नियमीत कामकाजाला सुरुवात केल्याचे सांगत मुंढे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. मात्र, अखेर मुंढेंना बदलीसंदर्भातील पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार मंत्रालयातील नियोजन विभागात सह सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज नाशिक महापालिका आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप केला. मात्र, त्यानंतर काही वेळातच मुंढे यांना बदलीचे पत्र मिळाले. त्यामुळे मुंढेंच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले आहे. तर, मुंढे यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या बदलीसाठीचे प्रयत्न आणि अन्य चर्चा होत होत्या. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंढे यांच्या पाठीशी उभे राहिल्याने आमदारांसह महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करूनही उपयोग होत नव्हता. मुंढे यांची बदली झाल्याने नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी मुंढे समर्थक नागरिकांची बैठक गुरुवारी सायंकाळी होणार असून, त्या माध्यमातून आंदोलनाची तयारीदेखील सुरू झाली आहे.

तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने अवघ्या नऊ महिन्यांत पुन्हा बदली केली आहे. गेल्या बारा वर्षातील मुंढे यांची ही अकरावी बदली आहे. त्यांची 2016 पासूनची ही चौथी बदली आहे. आधी ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते आणि त्याही आधी सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. दरम्यान, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी मुंढेंची नियुक्ती झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, ती केवळ अफवाच असून मुंढेंना मंत्रालयातच नियुक्ती देण्यात आली आहे.

Copy