कुलगुरुंच्या राजीनाम्यावर दोन गट आमने-सामने

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याचे तीव्र पडसाद शिक्षण क्षेत्रात उमटले आहेत. विद्यापीठ विकास मंचने राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केला आहे, तर दबावातूनच कुलगुरुंनी राजीनामा दिल्याचे विद्यार्थी संघटनांनी म्हटले आहे.

शासकीय हस्तक्षेप वाढल्यानेच राजीनामा : दिलीप पाटील

कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांचा मुळात स्वभाव असा आहे की, ते कुणालाही दोष देत नाही. त्यामुळे त्यांनी प्रकृती अस्वास्थाचे कारण पुढे केले आहे. प्रत्यक्षात विद्यापीठाच्या कामकाजात गेल्या वर्षभरापासून शासकीय हस्तक्षेप वाढल्याने आणि अस्तित्व दाखवू पाहणार्‍या विद्यार्थी संघटनांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांना मनस्ताप झाला. यातूनच त्यांनी राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी दिली. विद्यार्थी संघटनांनी ज्या पद्धतीचे आरोप केले आहेत किंवा तक्रारी केल्या आहेत त्यावर कार्यवाहीसाठी विद्यापीठाची एक चौकट आहे. प्रा. भटकर यांच्यासंदर्भात समिती गठीत करण्यात आली होती. परंतु, दोन अध्यक्षांनी राजीनामे दिले. दोन समित्यांनी माहुलीकर यांना चौकशीअंती क्लिनचीट दिली आहे. आरोपांमुळे व्यथित होत कुलगुरूंनी राजीनामा देणे हे अत्यंत खेदजनक आहे, असेही दिलीप पाटील म्हणाले.

पुढील कुलगुरुंनी विद्यापीठ विकास मंचपासून लांब राहावे : विष्णू भंगाळे

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह लोणेरेच्या कुलगुरूंना राजीनामा द्यावा लागणे याला विद्यापीठ विकास मंचची दडपशाही कारणीभूत आहे. डॉ. पी. पी. पाटील यांच्या माध्यमातून एक चांगले व्यक्तीमत्व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला लाभले होते. मात्र त्यांना बळीचा बकरा व्हावे लागले आहे. मुदत संपण्यापूर्वीच कुलगुरूंना राजीनामा द्यावा लागणे हा विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासाला एक कलंक लागला आहे, पुढील कुलगुरूंनी विद्यापीठ विकास मंचच्या पदाधिकार्‍यापासून चार हात लांबच रहावे, अशी प्रतिक्रिया अधिसभा सदस्य आणि माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विष्णू भंगाळे यांनी दिली. कुलगुरूपदाचा कार्यभार अप्रत्यक्षपणे दिलीप पाटील व विद्यापीठ विकास मंच पाहायची. या कारभाराला डॉ. पी. पी. पाटील कंटाळले होते. पाटील यांच्या राजीनाम्यांनंतर दिलीप पाटील म्हणतात की, आम्हाला विचारून राजीनामा दिलेला नाही. म्हणजे केवढी दडपशाही म्हणावी ? कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठ मंचाला न विचारता राजीनामा दिला हा सर्वात मोठा निर्णय आहे. राज्यात भाजपच्या सत्तेवेळी नियुक्त झालेल्या राज्यातील काही कुलगुरुंची, अधिकार्‍यांची पात्रता तपासावी. त्यातून काही कुलगुरुंची सत्यता बाहेर येईल, असेही भंगाळे म्हणाले आहेत.

भगवान के घर देर है अंधेर नही : देवेंद्र मराठे

एनएसयूआयतर्फे विद्यापीठातील भोंगळ कारभाराविरोधात अनेकदा आवाज उठविण्यात आला होता. कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनाही जाब विचारण्यात आला होता. काही प्रकरणांवरून कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांची चौकशी होणार होती. प्रा. सुधीर भटकर यांचे कथित प्रेम प्रकरण, खोटे ठराव, संशोधन चौर्य असलेले प्र कुलगुरु यांचा राजीनामा न घेणे, प्राध्यापकांना दिलेली बढती, लॉकडाऊन काळात एका महाविद्यालयास
मुलाखतीसाठी परवानगी आणि दुसर्‍या महाविद्यालयास परवानगी नाकारणे, तक्रार असतांनाही 17 जणांना नियुक्ती आदेश व एका महिलेस आदेश न देणे अशा अनेक वादग्रस्त प्रकरणांबाबत कुलगुरू मौन साधून होते. मात्र उशिरा का होईना? त्यांनी आपल्या पदाचा स्वत:हून राजीनामा दिल्याने भगवान के घर देर है अंधेर नही, अशी प्रतिक्रिया एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिली.

अनेक प्रश्‍न अनुत्तरित : अ‍ॅड. कुणाल पवार

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी कुणाच्या तरी दबावातूनच राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अ‍ॅड. कुणाल पवार यांनी दिली. राज्य शासनाविरोधात जे लोक आता बोलत आहे ते गेल्या दोन वर्षापासून कुठे होते? विद्यापीठाच्या भोंगळ काराभाराबाबत जे आरोप झाले त्याचे खंडन का केले गेले नाही ? ठेकेदाराची बिले काढण्यासाठी खोटे ठराव का करण्यात आले ? प्र. कुलगुरू माहुलीकर यांच्यावर संशोधन चौर्याचा आरोप असतांनाही त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? कर्मचार्‍यांचे बोनस दिले नाही अशा अनेक प्रकरणांसंदर्भात कुलगुरूंवर दबाव होता. तो दबाव कुणाचा होता? हे आता तरी जाहीर झाले पाहिजे. आम्ही प्र. कुलगुरूंचा राजीनामा मागितला होता पण त्यांनी दिला नाही. डॉ. पी. पी. पाटील यांनी राजीनामा देणे ही क्लेशदायक बाब आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. कुणाल पवार यांनी दिली.