Private Advt

नो व्हॅक्सीन, नो पेट्रोल’च्या आदेशाला जळगावकरांचा ठेंगा

जळगाव –  शहर महापालिका प्रशासनाने शुक्रवारपासून ‘नो व्हॅक्सीन, नो पेट्रोल’ चे आदेश काढले होते. मात्र, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मनपाकडून कोणतीही यंत्रणा कार्यान्वितच करण्यात आलेली नसल्याचे मनपाच्या आदेशाला जळगाव शहर वासियांनी ठेंगा दाखवला असल्याचे शुक्रवारी समोर आले. शहरातील कोणत्याही पेट्रोल पंपवर मनपाकडून आपल्या आदेशाची अंमलबजावणीसाठी एकही कर्मचारी नसल्याचे मनपा प्रशासन आदेश काढून सुस्त बसले आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मनपा उपायुक्त शाम गोसावी यांनी गुरुवारी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळेल अशी अशे आदेश पारित केले होते. या आदेशाची अंमलबजावणीसाठी मनपा प्रशासनाकडून काही पथकांची नियुक्ती केल्याचा दावा देखील करण्यात आला होता. मात्र, हा दावा केवळ नावालाच असल्याचे दिसून आला. तसेच मनपाच्या आदेशाबाबत नागरिकांकडून देखील नाराजी व्यक्त केली जात होती. तसेच केवळ पहिलाच डोस घेतलेल्यांबाबत देखील मनपाचे नेमके धोरण काय ? याबाबत देखील कोणतेही धोरण मनपाने स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे मनपाकडून या आदेशाची अंमलबजावणी देखील होणे कठीण असल्याचे दिसून येत आहे.

बँक मॅनेजर व हॉटेल चालकांची होणार बैठक
लसीकरणासाठी सक्ती न करता, मनपाकडून आता लसीकरणासाठी जनजागृती करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. यासाठी बँक व हॉटेल मालकांची बैठक मनपाकडून घेतली जाणार आहे. ग्राहकांकडे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र तपासले जाणार आहे. जर ग्राहकांनी लसीकरण केले नसेल तर त्यांना बँकेत प्रवेश मिळेल, मात्र त्या ग्राहकांना मनपाच्या लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करून घेण्याबाबत विनंती केली जाणार आहे, हीच अंमलबजावणी हॉटेल व शहरातील इतर दुकानांसाठी देखील केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.