जळगावकरांवर करवाढ नाही; पण द्यावे लागणार नवीन शुल्क

मनपा स्थायी सभेत 1,169 कोटींचे अंदाजपत्रक सादर; गाळे हस्तांतरणाचे संकेत

0

जळगाव । जळगावकरांवर (jalgaon) करवाढीचा कोणताही बोझा नसलेले 1 हजार 169 कोटी 70 लाख रुपयांचे अंदाजपत्रक गुरुवारी, महापालिका स्थायी समितीच्या सभेत सादर करण्यात आले. 10 कोटी 43 लाख रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे.
स्थायी समितीची विशेष सभा सभापती राजेंद्र घुग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सन 2021-2022 साठी 1169 कोटी 70 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सभेत सादर केले. या अंदाजपत्रकात जळगावकरांवर कुठलीही करवाढ (tax) सुचविण्यात आलेली नाही. मात्र, आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करताना महापालिका मालकीच्या मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळेधारकांकडून थकलेले भाडे अर्थात नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्यासह गाळ्यांच्या हस्तांतरणाचे संकेत दिले. अंदाजपत्रकात प्रारंभीची शिल्लक 298 कोटी 44 लाख इतकी आहे. त्यात महापालिकेचे महसुली उत्पन्न 363 कोटी 54 लाख रुपये, भांडवली उत्पन्न 399 कोटी 54 लाख, असाधारण देवघेव 56 कोटी 8 लाख, पाणीपुरवठा 45 कोटी 52 लाख तर मलनिःस्सारण योजनेचे उत्पन्न 6 कोटी 75 लाख दर्शविण्यात आले आहे.

नवीन योजनांचे शुल्क लागू होणार

महापालिकेच्या अंदाजपत्रकात कुठल्याही प्रकारची करवाढ सुचविण्यात आलेली नाही. मात्र, मलनिःस्सारण योजना पूर्ण झाल्यानतंर मलप्रवाह कर नव्याने लागू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. महापालिकेकडून देण्यात येणार्‍या विविध दाखले व उतारे तसेच हस्तांतरणाच्या सेवा देतांना आकारण्यात येणार्‍या सेवा शुल्कात वाढ सुचविण्यात आली आहे.

गाळ्यांपासून मिळणारे उत्पन्नच प्रमुख स्त्रोत

मुदत संपलेल्या गाळ्यांच्या बाबतीत, मागील कालावधीमध्ये विविध न्यायालयाचे झालेले निर्णय राज्य शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले आदेश, तसेच अधिनियमातील कलम 79 मध्ये सन 2018 मध्ये करण्यात आलेला बदल विचारात घेवून या गाळ्यांच्या पुढील कालावधीसाठी करावयाच्या हस्तांतरणाबाबत सविस्तर प्रस्ताव नुकताच महासभेपुढे निर्णयासाठी सादर करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महानगरपालिकेच्या स्वत:च्या उत्पन्नापैकी व्यापारी संकुलातोल गाळ्यांपासून मिळणारे उत्पन्न हे प्रमुख आहे. यावरच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अवलंबून असल्याचेही आयुक्तांनी मनोगतातून म्हटले आहे. गेल्या साधारणपणे 8 वर्षापासून हा विषय प्रलंबोल असल्यामुळे मुदत संपलेल्या गाळ्यांची नुकसान भरपाईची रक्कम मोठ्या प्रमाणात येणे असून ती वसूल करण्याच्या संदर्भात महानगरपालिकेस त्वरीत कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी हा विषय येत्या काळात मार्गी लावण्याचे संकेत दिले आहेत. शहरवासियांना किमान नागरी सुविधा देण्याचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जळगाव मनपाच्या मालकीच्या एकूण 27 व्यापारी संफुलांमधील एकूण 4,691 गाळ्यांपैकी 23 व्यापारी संकुलामधील 2,608 गाळ्यांची मुदत सन 2011-12 व त्यानंतर संपलेली आहे.

सभापती अभ्यास करणार

प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी सभा तहकूब केली. पुढील तहकूब सभेत स्थायी सभापतींकडून या अंदाजपत्रकात सुधारणा करुन त्यानतंर सुधारीत अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे.

असा येईल रुपया (उत्पन्नाची जमा बाजू )

आरंभीची शिल्लक – 298 कोटी 44 लाख
महसुली जमा – 363 कोटी 54 लाख रुपये
भांडवली जमा – 399 कोटी 36 लाख रुपये
असाधारण देवघेव – 56 कोटी 8 लाख रुपये
परिवहन – 1
पाणीपुरवठा – 45 कोटी 52 लाख रुपये
मलनिस्सारण – 6 कोटी 75 लाख रुपये
एकूण जमा – 1169 कोटी 70 लाख रुपये

असा जाईल रुपया (खर्चाची बाजू )

अखेरची शिल्लक – 10 कोटी 43 लाख रुपये
महसुली खर्च – 423 कोटी 55 लाख रुपये
भांडवली खर्च – 606 कोटी 88 लाख रुपये
असाधारण देवघेव – 76 कोटी 32 लाख रुपये
परिवहन – 37 हजार
पाणीपुरवठा – 45 कोटी 74 लाख रुपये
एकूण खर्च- 1169 कोटी 70 लाख रुपये

Copy