VIDEO: ओलींमुळे नेपाळ संकटात; संसद बरखास्तीची शिफारस

0

काठमांडू – भारताचा शेजारी देश नेपाळकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. नेपाळी मीडिया पोर्टलनुसार नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी मंत्रिमंडळाच्या आपत्कालीन बैठकीत संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. शर्मा ओली यांनी शनिवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर रविवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती.

 

नेपाळच्या सत्ताधारी पक्षातील अंतर्विरोध पाहता राजकीय विश्लेषकांनी असे म्हटले होते की, नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यात पंतप्रधान पी.पी. शर्मा ओली यांच्यापेक्षा माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड आणि माधव नेपाळ गटाचा जास्त प्रभाव आहे, अशा परिस्थितीत के पी शर्मा ओली संसद बरखास्तीची शिफारस करू शकतात. नेपाळचे ऊर्जामंत्री म्हणाले की, संसद बरखास्तीबाबत एक पत्र राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायणकाजी श्रेष्ठ म्हणाले की, आज सकाळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्री उपस्थित नसल्याने घाईघाईने हा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी होऊ शकत नाही.

सत्ताधारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान माधवकुमार नेपाळ यांनी आजची ही घटना असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रचंड आणि माधव यांचे गट करत आहेत. ओली यांनी जूनमध्ये असा दावा केला होता की, त्यांना सत्तेतून काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनातज्ज्ञांनी संसद बरखास्तीच्या निर्णयाला घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. संसद विघटन करण्याबाबत नेपाळच्या राज्यघटनेत कोणतीही तरतूद नाही. जोपर्यंत संसदेद्वारे सरकार स्थापनेची शक्यता असते, तोपर्यंत सभागृह विसर्जनासंदर्भात कोणतीही तरतूद नाही, घटना तज्ज्ञ दिनेश त्रिपाठी म्हणाले आहेत. दरम्यान, मुख्य विरोधी पक्ष नेपाळ काँग्रेसने (एनसी) रविवारी पक्षाची तातडीची बैठक बोलविली आहे.

Copy