राष्ट्रवादी पुन्हा.. ध्यास परिवर्तनाच्या दौऱ्याला नंदुरबारपासून सुरुवात

जयंत पाटील, एकनाथ खडसे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

नंदुरबार | विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवार दिनांक २६ मार्चपासून ‘राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…’ या दौऱ्याला सुरुवात केली आहे.
राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौऱ्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे ध्येय नजरेसमोर त्यांनी ठेवले आहे.

स्थानिक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षसंघटना वाढीवर आणि सभासद नोंदणीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन जयंतराव पाटील यांनी यावेळी केले. गावागावात पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते निर्माण करण्याची गरज आहे.पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावावा. एकसंघ राहून पक्षाचे काम केल्यास त्याचा उत्तम निकाल आपल्याला मिळेल असा दृढ विश्वासही जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.
दौऱ्याची सुरुवात नंदुरबार जिल्हयातील शहादा विधानसभा मतदारसंघातून झाली. शहादा येथे घेतलेल्या या आढावा बैठकीला ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री हेमंत देशमुख, नंदुरबार जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनावणे, माजी आमदार उदयसिंग पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे, शहादा-तळोदा विद्यार्थी अध्यक्ष कुणाल पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष पुंडलिक राजपूत, शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.