नंदुरबार पोलिसांना चार दिवसात पाच बालविवाह रोखण्यास यश

बालविवाह रोखल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक

नंदुरबार प्रतिनिधी ।

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाणे हद्दीत सरी केलीपाडा येथे होणारा बालविवाह पथकाने रोखला आहे. गेल्या चार दिवसात नंदुरबार पोलिसांनी पाच बालविवाह रोखले आहेत. ऑपरेशन अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलिसांनी चार दिवसात पाच बालविवाह रोखल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

सविस्तर असे, मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील सरी केलीपाडा गावात एका अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे त्यांचे कुटुंबीय नियोजन करीत असल्याची माहिती मोलगी आणि अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांकडून १३ मे रोजी मिळाली होती. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील निंबापाटी गावाचा राऊतपाडा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार मोलगी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने तात्काळ माहिती काढली. मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील सरी केलीपाडा गावात एका अल्पवयीन मुलीचा विवाह अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील तरुणासोबत निश्चित केला होता. परंतु मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश केदार यांनी अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांचे व गावातील नागरिक यांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करून मनपरिवर्तन केले.

अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील निंबापाटी राऊतपाडा या गावात जावून अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावित यांनी माहिती घेतली. तेव्हा तेथे अल्पवयीन मुलीचा वालंबा गावातील तरुणासोबत विवाह निश्चित करुन १३ मे रोजीच विवाह होणार होता. परंतु अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावित यांनी अल्पवयीन मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांना तसेच ग्रामस्थांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले.