जीएमसीत म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या 43 वर्षीय महिला रुग्णावर गुरुवारी, यशस्वी शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे चार तास लागले.

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सध्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहे. या रुग्णांवरील उपचार व शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाने 18 तज्ज्ञ डॉक्टरांची समिती कार्यरत आहे. या समितीत कान-नाक घसा विभागाचे डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राऊत, दंतचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाल, नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ. प्रसन्न पाटील, डॉ. अंजली सिंग, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. उमेश जाधव, औषधवैद्यकशास्त्र डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ. सुबोध महाले, बधिरीकरणशास्त्र डॉ.स्वाती एम, डॉ. काजल साळुंखे, शरीर विकृतीशास्त्र डॉ. भारत घोडके, डॉ. अदिती सरनायक, क्ष-किरणशास्त्र डॉ. उत्कर्ष पाटील, डॉ. प्रयाग गारसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. कविता नेतकर आदींचा सहभाग आहे.

दरम्यान, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आला असून 23 रुग्णांवर सद्यस्थितीला उपचार सुरु आहे. या रुग्णालयात मागील दोन दिवसांत सुमारे 10 रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत.