एमआयडीसी पोलिसांनी घडविले खाकीतील माणुसकीचे दर्शन

0

बेशुध्द होवून रस्त्यावर पडलेल्या नागरिकाला केले रुग्णालयात दाखल

जळगाव– पोलीस दलाबाबात सर्वसामान्यांचे मत फारसे चांगले नसते़ पण काही पोलीस त्याला अपवाद आहे. ईच्छादेवी चौकात अचानक रस्त्यावर बेशुध्द पडलेल्या महावितरणमधील असिस्टंट लाईनमन विजय एकनाथ टोकरे (रा़ निंभोरा) यांना रुग्णालयात दाखल करून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह कर्मचार्‍यांनी खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविले आहे. टोकरे वेळेत रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचल्याने कुटुंबियांनी एमआयडीसी पोलिसांच्या पोलिसिंगचे कौतुक करत आभार मानले आहे.

निंभोरा येथील विजय टोकरे हे रहिवासी आहेत. जळगाव शहरातील आदर्शनगर युनिटमध्ये असिस्टंट लाईनमन म्हणून कार्यरत आहेत़ नियमित ते निंभोरा ते जळगाव अप-डाऊन करतात़ नेहमीप्रमाणे विजय हे रविवारी सकाळी 10 वाजता ईच्छादेवी चौकात चारचाकी वाहनातून उतरले़ परंतु, वाहनातून उतरताचं त्यांना चक्कर येण्यास सुरूवात झाली़ व ते बाजूच्या तरूणाचा हात पकडून खाली बसले व त्यांनी प्रकृती बिघडत असून त्वरित पोलिसांना बोलवा सांगितले़ याचवेळी अयोध्या निकाल व ईद-ए-मिलाद निमित्त एमआयडीसी पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ व क्युआरटी पथक हे ईच्छादेवी चौकात तैनात होते़ शिरसाठ यांना टोकरे रस्त्यावर पडल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लाईनमन टोकरे यांना क्युआरटी पथकाच्या मदतीने खाजगी वाहनातून खाजगी रूग्णालयात हलविले़

पोलिसांचे मानले आभार

दरम्यान, चक्कर येऊन कोसळल्यानंतर लाईनमन विजय टोकरे यांची प्रकृती चिंताजनक झाली होती़ पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतल्यानंतर वाहन येण्याआधी पोलीस प्रशिक्षणात मिळालेल्या उपचार पध्दतीचा वापर करून आलेला टोकरे यांची प्रकृती बरी करण्याचा पूर्ण प्रयत्न असे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांनी सांगितले. पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे वेळेवर उपचार मिळाल्यामुळे विजय टोकरे यांना एकप्रकारे जीवनदान मिळाले, असे म्हणता येईल़ अन्यथा उशीर झाला असता तर जीवावर बेतले असते़ तर टोकरे यांची प्रकृती आता ठणठणीत असून पोलिसांमुळे जीवनदान मिळाले असल्याचे म्हणत त्यांनी त्यांचे आभार मानले़

Copy