जरा हटके, आता प्रयोगशाळेतही मांसनिर्मिती

0

गुवाहटी । एकीकडे प्राणीप्रेमी आणि दुसरीकडे मांसाहार करणार्‍या खवय्यांसाठी एक हटके बातमी आहे. आयआयटी गुवाहटीच्या संशोधकांनी प्रयोगशाळेत मांस निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हे मांस पौष्टिक, तर आहेच पण त्यामुळे प्राण्यांचा जीवही वाचणार आहे.

बायो मटेरियल आणि टिशू अभियांत्रिकी प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांस निर्मितीसाठी नोव्हेल तंत्र वापरण्यात आले आहे. अशा तंत्राद्वारे तयार केलेले मांस संपूर्णतः नैसर्गिक व खाण्यास सुरक्षित असेल. मांस निर्मिती करताना त्याची चव बदलणार नाही, त्यातील पौष्टिक मूल्य नष्ट होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच त्यात हार्मोन्स, अ‍ॅनिमल सीरम व अँटीबायोटिक्स यासारख्या बाह्य रसायनांचा वापर टाळण्यात आला आहे, अशी माहिती आयआयटी गुवाहटीचे डॉ. बिमल मंडळ यांनी दिली आहे.

वाढत्या लोकसंख्येची अन्नाधान्याची गरज पूर्ण करताना या क्षेत्रातील उद्योगांवर दबाव येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने लोकसंख्या वाढ आणि त्यांच्या गरजांसंदर्भात एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार, सध्याच्या मांस उद्योगाची उत्पादन क्षमता ही सन 2050 पर्यंत ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याएवढी सक्षम नसेल. तसेच या उद्योगांमुळे पर्यावरण व नैसर्गिक स्त्रोतही संकटात येत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी प्रयोगशाळेत मांस निर्मितीचे प्रयोग केले जात आहेत. त्यात संशोधकांना यश आले आहे. प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसाची चव, रुप, पौष्टीक मूल्य नैसर्गिक मांसाप्रमाणेच कायम राहील याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसाला भारतीय व परदेशी बाजारपेठांत मोठ्या प्रमाणात मागणी राहील यावर संशोधकांना विश्‍वास आहे.

एक किलो चिकनसाठी 4 हजार लीटर पाणी
कोंबडीचे एक किलो मांस (चिकन) तयार करण्यासाठी सुमारे 4 हजार लीटर तर एक किलो मटण तयार करण्यासाठी 8 हजार लीटर पाण्याची आवश्यकता असते. तसेच मांसासाठी दररोज लक्षावधी प्राण्यांना ठार केले जाते. बहुतेक पशुधन उद्योगात (लाईव्हस्टॉक इंडस्ट्री) मोठ्या प्रमाणात टाकाऊ पाणी तयार होते. त्यांच्याकडून वातावरणात ग्रीनहाऊस गॅसेस सोडले जातात.

Copy