अलोकनाथ व त्यांच्या पत्नीने विनता नंदा यांच्याविरोधात ठोकला अब्रुनुकसानीचा दावा

0

मुंबई- बॉलिवूडमधील संस्कारी बाबा अर्थात अभिनेता आलोकनाथवर निर्माता, दिग्दर्शक विनता नंदाने बलात्काराचा आरोप केला आहे. दरम्यान आता आलोक नाथ यांची पत्नी आशु सिंह पतीच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. अलोक नाथ यांच्या पत्नीने विनता नंदा यांच्याविरोधात कायद्याची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. आशु सिंह यांनी मुंबईच्या महा न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करत, या प्रकरणाची चौकशी करण्याची करण्याची मागणी केली आहे. तसेच आलोक नाथ व आशु सिंह यांनी एकत्रित विनता नंदा यांच्याविरूद्ध १ रूपयाचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

आलोक नाथ यांचे वकील अशोक सरोगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोक नाथ यांच्या पत्नी आशु सिंह यांनी विनता यांच्या आरोपानंतर घरातून निघणे कठीण झाले असल्याचे आपल्या अर्जात म्हटले आहे. या आरोपानंतर प्रत्येकजण आमच्यायाकडे साशंक नजरेने बघू लागला आहे. आधी आम्ही याविरोधात अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलोत. मात्र पोलिसांनी आमची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही न्यायालयात अर्ज दाखल करून या प्रकरणाच्या पोलिस चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली आहे, असे आशु सिंह यांनी सांगितले. पोलिसांनी विनता नंदा यांना त्यांची फेसबुक पोस्ट डिलिट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही या अर्जात करण्यात आली आहे.

विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मद्यात काही तरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला होता. आलोक नाथ यांच्या पत्नीलाही याबाबत आपण माहिती दिली होती. मात्र तिने या प्रकरणात ती कुठलीच मदत करू शकणार नसल्याचे सांगत आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते, असाही विनता नंदा यांचा दावा आहे.

Copy