Private Advt

उल्हासनगर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षेबाबत मार्गदर्शन

उल्हासनगर : दहावीची परीक्षा अगदी जवळ आली आहे. अशा वेळी  परीक्षेला सामोरे जाताना ताण-तणाव कसा दूर ठेवावा आणि अभ्यासाचे कसे नियोजन करावे याबाबत सम्राट अशोक नगर, उल्हासनगर-३ येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. शिक्षण, जनआरोग्य आणि महिला-बाल विकास व पर्यावरण या विषयांवर काम करणाऱ्या लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजर्षि छत्रपती शाहू विद्या प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 
दहावीची परीक्षा अगदी तोंडावर आहे. मागील दोन वर्ष कोरोनमुळे ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षा पार पडल्या होत्या त्यानंतर आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यंदा दहावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन होणार आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आणि लेखनाचा कस लागणार आहे. म्हणून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे तणावमुक्त परीक्षा देण्याविषयी लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्ट फेब्रुवारी  महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयात समुपदेशन वर्ग घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सम्राट अशोक नगर, उल्हासनगर-३ राजर्षि छत्रपती शाहू विद्या प्रसारक मंडळ यांच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, ११ मार्च २०२२ रोजी समुपदेशन सत्र आयोजित आले होते. जवळपास ३२ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात मागील २० वर्ष काम करणारे संदीप परब यांनी यावेळी विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे आणि अभ्यासाचे सोपे तंत्र याबाबत मार्गदर्शन केले. संदीप परब यांनी  मागील सात ते आठ वर्ष शिक्षण पद्धती आणि शिकवण्याचे नवनवीन तंत्र याबाबत सखोल अभ्यास केला आहे. शिक्षण मुलांवर लादू न देता त्यांच्यातील उपजत क्षमतेला प्रोत्साहन देणारी पद्धत सद्या आवश्यक आहे , असे मत संदीप परब यांनी यावेळी व्यक्त केले.
विद्यार्थी मित्रांनी परीक्षेवर लक्ष केंद्रीत करतानाच भविष्याचाही विचार करायला हवा जेणेकरून उद्दिष्ट डोळ्यासमोर राहिल्यास एकाग्रता आणि सकारात्मक विचार वाढवण्यास फायदा होतो, असा सल्ला संदीप परब यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी एकाग्रता, बुद्धिमत्ता , व्यापक विचार करण्याचा दृष्टिकोन अशा मुद्यांना चपखल उदाहरणांसाह सादर केले. जागतिक कीर्तीचे ख्यातनाम शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे आयुष्य आणि त्यांनी असाध्य दुर्मिळ आजारावर मात करून केलेलं प्रचंड संशोधन याचा दाखला संदीप परब यांनी दिला. तसेच याच परिसरातील वैभव छाया काही वर्षांपूर्वी कर्करोगावर मात करून साहित्य, चित्रपट सृष्टीत केलेल्या महत्वपूर्ण योगदानाचे उदाहरण विद्यार्थ्यांना दिले. दीड तास त्यांनी विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती आणि एकाग्रता कशी राखावी याचे महत्व संदीप परब यांनी विविध उदाहरणे देत पटवून दिले. विद्यार्थ्यांनी या सत्राचा पुरेपूर आनंद घेतला. यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन परब यांनी केले.
लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रवीण काजरोळकर, शिक्षण सल्लागार शैलेश कसबे, राजर्षि छत्रपती शाहू विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महादेव सोनावणे, महा. अंनिसचे राज्य पदाधिकारी उत्तम जोगदंड  आदी या वेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या मुख्याध्यापीका मीनाक्षी सोनावणे यांनी केले. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या सूचना शिक्षकांना केल्या होत्या. त्याला अनुसरून  लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टने नुकताच शहापूर आणि मुंबईतील दादर तसेच विक्रोळी मधील दहावी आणि बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले होते.