तेजीने मार्चला सुरुवात; सेन्सेक्समध्ये वाढ

मुंबई : जीडीपीत वाढ झाल्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून येत आहे. आज आठवड्याच्या आणि मार्चच्या पहिल्याच दिवसी सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी आहे. गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल वाढल्याने सेन्सेक्स ८०० वाढला आहे. तर निफ्टी २५० अंकांनी वाढला आहे. गुंतवणूकदारांची किमान दोन लाख कोटींची भरपाई झाली आहे.

आज नवीन महिना सुरु झाला असून पहिल्याच सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने जबरदस्त सुरुवात केली आहे. आशियातील सकारात्मक संकेतांनी बाजारात तेजीचा माहौल आहे. बँका, वित्त संस्था, ऑटो, मेटल, रियल्टी या क्षेत्रात खरेदीचा ओघ आहे.

अमेरिकेने १.९ लाख कोटी डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजला मंजुरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आशियातील भांडवली बाजारात तेजी असल्याचे शेअर दलालांनी सांगितले. त्याशिवाय जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारला आहे. तेलाची किंमत ६५ डॉलरवर गेली आहे. इंधन मागणीत होणारी वाढ अर्थव्यवस्था सावरत असल्याची लक्षणे आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेने चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वृद्धी नोंदवली आहे. त्यामुळे बाजारातील वातावरण बदलले आहे. शुक्रवारी संध्याकाळी केंद्र सरकारने विकासदराची आकडेवारी जाहीर केली. करोना संकटाशी दोन हात करताना झालेल्या प्रचंड हानीमधून भारतीय अर्थव्यवस्था सावरली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत आर्थिक विकास दर वाढला आहे. सलग दोन तिमाहीतील उणे विकासाची मरगळ झटकत अर्थव्यवस्थेने ०.४ टक्के विकासदर नोंदवला.

Copy