पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांनी गांधीजींना वाहिली आदरांजली

0

नवी दिल्ली- महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन बापूंना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे हीच एक संधी आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळपासूनच सर्वपक्षीय नेते राजघाटवर पोहोचत होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी राजघाटवर जाऊन गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतले.

दुसरीकडे राज्यात वर्धा जिल्ह्य़ातील सेवाग्राम येथे काँग्रेसने कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा आणि जाहीर सभेच्या आयोजनामुळे काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीच्या राजकीय रणसंग्रामास येथून प्रारंभ करणार असल्याचे दिसते. तर भाजपानेही पदयात्रा आयोजित केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरणनिर्मिती म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५० किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. वर्धा येथे मंगळवारी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून नागपूरमधील पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले आहेत.