नेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी

0

जळगाव –  केशवस्मृती प्रतिष्ठानने जळगाव शहरातील नेरी नाका वैकुंठधाममध्ये अत्याधुनिक शवदाहिनी बसविली असून, त्यामुळे मृतदेहावर अतिशय कमी वेळात दाहसंस्कार करणे शक्य होणार आहे. ही सुविधा येत्या आठवडाभरात उपलब्ध होईल. सेवाशुल्क म्हणून 1500 रुपये आकारले जाणार आहेत, अशी माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारणत: एका झाडाची लाकडे लागतात. परंतु पावसाळ्यात लाकडे ओली असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नेरी नाका वैकुंठधाममध्ये दररोज 8 ते 10 मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडे लागतात. शवदाहिनीमुळे पर्यावरण रक्षण होण्यासह लाकडांचीही बचत होणार आहे.

एलपीजी गॅसवर काम करणार, एका दिवसात 8 अंत्यसंस्कार शक्य – शवदाहिनी पूर्णपणे एलपीजी गॅसवर (lpg gas) कार्यान्वित राहणार आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊन अस्थी मृताच्या नातेवाईकांना 2 तासांनी उपलब्ध होतील. शवदाहिनीमध्ये दररोज 8 मृतावर अंत्यसंस्कार केले जाऊ शकतील. लोकार्पणाचा कार्यक्रम पुढील आठवड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अंमळकर, सचिव रत्नाकर पाटील, प्रकल्प प्रमुख नंदू अडवाणी, समन्वयक सागर येवले उपस्थित होते.

Copy