‘बत्ती गुल’, लोकल थांबल्या: मुंबईकरांचे हाल

0

मुंबई: वीज पुरवठा करणारे ग्रीड फेल झाल्याने मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका लोकल सेवेला बसला आहे. सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेले नोकरदार वर्ग स्टेशनवरच अडकला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असून प्रवाश्यांनी संयम ठेवण्याचे आवाहनही केले जात आहे. दरम्यान यावरून विरोधकांनी आता सरकारला लक्ष केले आहे. माजी मंत्री भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारच्या कामगिरीवर टीका केली आहे.

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सगळ्याच शहरांमधील वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सध्या परीक्षेचा कालावधी असल्याने याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. महाविद्यालयं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विशेषतः ११ ते १२ या वेळेतील आणि पुढील सत्रातील परीक्षा रद्द केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

दरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ग्रीड फेल झाले आहे. महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून ४५ मिनिटात वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. शिवाय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु असून प्रवाश्यांनी संयम ठेवावे असे आवाहन केले आहे.

Copy