Private Advt

‘जनशक्ति’च्या वृत्ताची दखल, मुख्यमंत्री घेणार बैठक

0

खान्देशातील प्रलंबित विकासकामांवर होईल चर्चा, आ. खडसेंची माहिती

जळगाव – ‘निवडणुकीच्या तोंडावर विकासाची आठवण’ या मथळ्याखाली ‘जनशक्ति’ने वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी खान्देशातील प्रलंबित असलेल्या विकासकामांबाबत बैठक लावण्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना दिली.

खडसे-महाजन वादाचा जिल्ह्यासह खान्देशातील विकासाला मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात ‘जनशक्ति’ने ‘निवडणुकीच्या तोंडावर विकासाची आठवण’ या मथळ्याखाली प्रथम पानावर वृत्त प्रकाशित करून खान्देशातील घोषित आणि मंजूर प्रकल्प प्रलंबित असल्याची माहिती उघड केली.

आ. खडसे यांच्या कार्यकाळात अनेक कामे मंजूर

आ. एकनाथराव खडसे हे मंत्री असतांना त्यांच्या कार्यकाळात यातील बहुतांश कामे मंजूर झाली होती. मात्र, राजकीय वादामुळे या कामांना ब्रेक लागला. या वृत्ताची जिल्ह्यासह खान्देशात मोठी चर्चा होत आहे. यासंदर्भात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनीदेखील वरीष्ठ पातळीवर चर्चा केली. त्यानुसार ‘जनशक्ति’ने उपस्थित केलेल्या मुद्यांविषयी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्‍वासन दिले असून, लवकरच या बैठकीची तारीख निश्‍चित केली जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे खान्देशातील प्रलंबित विकासकामांना आ. खडसे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा चालना मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहे.